चाकणमध्ये ट्रॅफिक कोंडीचा भडका.! नागरिक त्रस्त...

चाकणमध्ये ट्रॅफिक कोंडीचा भडका.! नागरिक त्रस्त...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, चाकण

पुणे-नाशिक महामार्गासह चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर आणि चाकण-आंबेठाण या मार्गांवर दररोज हजारो वाहनांची गर्दी होत असल्याने चाकण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः सकाळी ऑफिस व शाळा वेळेत तसेच संध्याकाळी औद्योगिक वसाहतीतील शिफ्ट संपल्यानंतर रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या चाकणमध्ये शेकडो कंपन्यांमधून रोज हजारो कर्मचारी ये-जा करतात. त्यातच रिक्षांची अनिर्बंध वाढ, चौकात होणारी बेदरकार पार्किंग, तसेच रस्त्यांची अपुरी रुंदी यामुळे वाहतुकीची कोंडी अधिकच तीव्र झाली आहे.

या समस्येमुळे नागरिकांचे प्रवासाचे वेळापत्रक विस्कळीत होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. स्थानिक प्रशासन, MIDC व पोलिस विभाग यांच्यात समन्वय नसल्याने ही समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे.

दरम्यान, वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी उड्डाणपूल, बायपास रस्ता, सार्वजनिक वाहतुकीत वाढ आणि रिक्षांवर नियंत्रण या उपाययोजनांची तातडीने गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

 नागरिकांचा सवाल : चाकणसारख्या औद्योगिक हबमध्ये इतकी मोठी वाहतूक कोंडी होत असेल तर गुंतवणूकदार आणि कामगार यांच्यावर याचा थेट परिणाम होणार नाही का?