आणि त्या तरुणीचे पोलिस होण्याचे स्वप्न भंगले.?
![आणि त्या तरुणीचे पोलिस होण्याचे स्वप्न भंगले.?](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66aba8cce3818.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
पोलिस भरतीसाठी आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेद्वाराला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही,त्या ऐवजी एसईबीसी, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाची निवड करणार असल्याचे परित्रक जाहीर झाल्यानंतर खेडले येथील तरुणी मयुरी संतोष मोेरे हिचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे मेहनत घेऊन पात्र होवून देखील प्रशासनाच्या परिपत्रकामुळे आपली निवड होणार नसल्याने जो पर्यंत ई डब्ल्यू एस प्रवर्गातील मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत नाशिक शहर येथील पोलीस प्रक्रिया स्थगित करण्यात यावी. या मागणीसाठी खेडले येथील मयुरी संतोष मोरे व पालकांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
खेडले येथील मयुरी मोरे या युवतीने दि.३१ मार्च २०२४ रोजी ई डब्ल्यू एस प्रवर्गातून नाशिक शहर पोलिस भरतीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर दि.२८ जून २०२४ रोजी मैदानी चाचणी व दि.७ जुलै २०२४ रोजी झालेल्या लेखी परीक्षेतून उत्तीर्ण होवून ई डब्ल्यू एस प्रवर्गातून ती पोलिस भरतीसाठी प्राप्त ठरली आणि दि.११ जुलै २०२४ रोजी नाशिक शहर येथे तात्पुरती निवड यादीत ई डब्ल्यू एस प्रवर्गातून तीची निवडही झाली. दि.१६ जुलै २०२४ रोजी कागदपत्र पडताळणीही पुर्ण झाली. संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पोलिस महा.संचालकांच्या परिपत्रकानुसार ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना या प्रवर्गाऐवजी एसईबीसी,ओबीसी किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय द्यावा, त्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्याचे निर्देश परिपत्रकाव्दारे देण्यात आले. त्यामुळे मयुरी मोरे हिच्या पोलिस होण्याचे स्वप्न भंगले आहे.मेहनत करुन यशस्वी झाले तरी देखील पदरी निराशाच आली असल्याचे मत तिने व्यक्त केले असून जोपर्यंत ई डब्ल्यू एस प्रवर्गातील मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत नाशिक शहर येथील पोलीस प्रक्रिया स्थगित करण्यात यावी.अशी मागणी मयुरी मोरे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली आहे.