पत्रकारावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, आर्णी प्रेस क्लब संघटनेची मागणी..

पत्रकारावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, आर्णी प्रेस क्लब संघटनेची मागणी..

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड

मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यांत लोकशाहीचा चौथ्या स्तंभावर वारंवार आघात होत असून, प्रशासनातील मुजोर अधिकारी व अवैध व्यवसायीकांची मनोपल्ली सुरू आहे. अधिकारी व अवैध व्यवसायिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे. अधिकारी व अवैध व्यवसायीकांच्या संगणमताने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्राला बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्या जात आहे. पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कुठेतरी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

घाटंजी येथील पत्रकार कज्जुम कुरेशी यांनी घाटंजी शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाबद्दल मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना तक्रार दिली असता; घाटंजी येथील ठाणेदार यांनी अवैध व्यवसायिकांवर कारवाई करण्याऐवजी, पत्रकाराने दिलेल्या तक्रारीचा वचपा काढण्यासाठी घाटंजी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्याच्या मालकाच्या तक्रारीवरून पत्रकार कज्जुम कुरेशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून, लोकशाहीचा चौथा स्तंभाची मुस्कटदाबी केली आहे. सदर घटनेचा दि. 23 ऑक्टोबर रोजी आर्णी प्रेस क्लब संघटनेच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.

सदर प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन, सदर प्रकरणाची चौकशी करावी व संबंधित पत्रकारावर दाखल केलेले खंडणीचे गुन्हे मागे घेऊन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या घाटंजी येथील ठाणेदारावर निलंबनाची कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आर्णी प्रेस क्लब व इतर संघटनेच्यावतीने आर्णी तहसीलदार यांच्यामार्फत; उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे. यावेळी प्रेस क्लब संघटनेचे अध्यक्ष राम पवार, उपाध्यक्ष आशिफ शेख, प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गणेश हीरोळे सर, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विनोद सोयाम, नौशाद अली, रफिक सरकार, जाफर शेख, आरीफ शेख, प्रशिक मुनेश्वर, रमेश राठोड, इरफान रजा, चिंतामण चहांदे, विरेंद्र पाईकराव, शानु चव्हाण उपस्थित होते.