मोठी बातमी : नाणेकरवाडीत जमीन विक्रीच्या बहाण्याने तब्बल १ कोटी १५ लाखाची फसवणूक...!

मोठी बातमी : नाणेकरवाडीत जमीन विक्रीच्या बहाण्याने तब्बल १ कोटी १५ लाखाची फसवणूक...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण: एकाच्या मालकीच्या जमिनीवर प्लॉटिंग करून त्याची विक्री करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची घटना नाणेकरवाडी गावातून समोर आली आहे. ही घटना ४ नोव्हेंबर २०११ ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीत नाणेकरवाडी गावच्या हद्दीत घडली आहे.

याप्रकरणी शिवाजी रामजी बिरादार (६८, रा. चिंचवड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेकानंद वसंत शेंडे (रा. नाणेकरवाडी, खेड), सलीम मुबारक शेख (५७, रा. नाणेकरवाडी, खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी सलीम मुबारक शेख यांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर विवेकानंद वसंत शेंडे यांचा चाकण पोलिसांकडून शोध सुरु आहे. फिर्यादी शिवाजी बिरादार यांची खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे १.४१ हेक्टर जमीन आहे. ही जमीन विकसित करून तिथे प्लॉटिंग करून विक्री करण्यासाठी आरोपींनी बिरादार यांच्यासोबत आर्थिक व्यवहार केला होता. 

प्लॉटिंगची विक्री करून देण्यासाठी आरोपींनी बिरादार यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतले. दरम्यान, बिरादार यांनी त्या जमिनीमध्ये सपाटी करण करून डांबरी रस्ते बनवले. ड्रेनेज लाईनचे काम करून एक दोन गुंठ्यांचे प्लॉट तयार करून दिले. त्यानंतर बिरादार यांची परवानगी न घेता आरोपींनी ती जमीन उत्तम वसंत कुसाकर यांना विक्री करण्यासाठी दिली.

आरोपींनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीरपणे जमिनीची विक्री केली. त्यामुळे बिरादार यांनी आरोपींना दिलेले दोन कोटी रुपये आणि जागेत केलेल्या कामाचे १५ लाख रुपये मागितले. हे पैसे देण्याबाबत बिरादार आणि आरोपी यांच्यात लेखी करार झाला आहे. आरोपींनी बिरादार याना एक कोटी रुपये दिले. उर्वरित १ कोटी १५ लाख रुपये न देता त्यांची फसवणूक केली असल्याची तक्रार बिरादार यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ३४अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड हे करत आहेत.