मोठी बातमी : खेडचे प्रांताधिकारी जोगेद्र कट्यारे यांचे जिल्हाधिकारी व आमदार यांच्यावरील आरोपाने खळबळ..!
![मोठी बातमी : खेडचे प्रांताधिकारी जोगेद्र कट्यारे यांचे जिल्हाधिकारी व आमदार यांच्यावरील आरोपाने खळबळ..!](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_6659981851845.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड(राजगुरूनगर): पुणे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे व खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर खेडचे प्रांताधिकारी जोगेद्र कट्यारे यांनी गंभीर आरोप केल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याचा बरोबर प्रांताधिकारी कट्यारे यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची लोकसभेच्या निकाला अगोदर बदलीही करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
खेड प्रांताधिकारी यांनी निवडणूक आयोग व महसूलचे अप्पर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणी आधीच त्यांची बदली करण्याची मागणी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप प्रांताधिकारी जोगेद्र कट्यारेंनी यांनी लिहिलेल्या पत्रातून केला आहे. सध्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पाटील आमदार आहेत. त्यामुळे कट्यारे यांनी केलेल्या आरोपातुन कुणाला लक्ष केले जाणार याचीही चर्चा रंगू लागली आहे.
सुहास दिवसे हे पुणे जिल्हाधिकारी पद स्वीकारण्या अगोदर अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, पीएमआरडीएचे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतला त्यावेळीही त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी अनेक राजकीय व्यक्तींनी सुहास दिवसे हे राजकीय हितसंबंधांचा वापर करून पुणे जिल्हाधिकारी या खुर्चीवर बसल्याचा आरोप करण्यात आला होता.
आता पुन्हा त्यांच्याच अंतर्गत काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुहास दिवसे हे खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रभावातून काम करत असल्याचा खळबळ जनक आरोप प्रांताधिकारी कट्यारे यांनी केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात सुहास दिवसे सतत आमदार दिलीप मोहिते पाटील यांना भेटत होते. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचाही सुहास दिवसेंना प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. असाही आरोप कट्यारे यांनी केल्याची माहिती मिळाली आहे.
खेडचे प्रांताधिकारी जोगेद्र कट्यारे यांनी सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असल्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणी अगोदर त्यांची बदली करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. जोगेद्र कट्यारेंनी पत्रात दिलीप मोहिते पाटलांचे थेट नाव घेत उल्लेख केला नसला, तरी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार या उल्लेखातून त्यांचा रोक पूर्णतः आमदार मोहिते पाटलांकडेच असल्याचे स्पष्ट होते.
या संदर्भात आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही माध्यमाच्या समोर येऊन आपली बाजू मांडली आहे. दिलीप मोहिते पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विधानसभेच्या समोर उपोषणाला बसण्याचा इशारा मोहिते पाटील यांनी दिला आहे. मी त्यांना कोणतेही काम असे करा, तसे करा म्हणून सांगितले नाही. किंवा तसे कोणासाठी पत्रही दिले नाही. आर्थिकचा तर काही प्रश्नच नाही, माझी तर विनंती आहे की या प्रकरणाची थेट सीबीआय चौकशी लावा असा निर्वांनीचा इशारा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला आहे. यामुळे आता खेड प्रांताधिकारी जोगेद्र कट्यारे यांनी जो लेटर बॉम्ब टाकला त्यावरून संपूर्ण पुणे जिल्ह्याचे राजकारण तापल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की..