बुलेट ट्रेन’च्या गतीने होईल देशाचा विकास – मंत्री सुधीर मुनगंटीवार
![बुलेट ट्रेन’च्या गतीने होईल देशाचा विकास – मंत्री सुधीर मुनगंटीवार](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_6600f570a4892.jpg)
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, चंद्रपूर
यंदा लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा झंझावात बघता देशाच्या विकासाची गाडी ‘बुलेट ट्रेन’पेक्षा वेगाने धावेल असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर मतदारसंघ लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
योगनृत्य परिवार ट्रस्ट चंद्रपूरतर्फे विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवर उपक्रम राबवून सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव वाढवणारे सुधीर मुनगंटीवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी योगनृत्य परिवारचे गोपाल मुंदडा व चमूच्या कार्याचे कौतुक केले.
योगनृत्याच्या माध्यमातून आरोग्याची गंगोत्री चंद्रपुरातून वाहायला सुरुवात झाली असून ती मुंबईत पोहोचली आणि मी जर खासदार म्हणून निवडून आलो तर ती दिल्लीपर्यंत पोहोचेल असा निर्धार ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
संसद भवनात छत्रपतींचे स्मारक उभारण्याचा मानस...
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेचे राज्य हा लोकशाहीचा आत्मा असून दिल्लीचा तख्त राखणाऱ्या छत्रपतींची खासदारांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने संसद भवनात वीर राजे छत्रपतींचे भव्यदिव्य स्मारक उभारण्याचा मानस मुनगंटीवार यांनी बोलून दाखवला.
चंद्रपूर पोहचला देशभरात...
देशभरात कौतुकास पात्र ठरलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, आदिवासी विद्यार्थ्यांचे मिशन शौर्य, सियावर रामचंद्र की जय, ग्रीन भारतमाता गिनेस बुकमध्ये नोंद चंद्रपूरचे नाव देशात पोहचले आहे या सर्व उपक्रमाची इतिहासात नोंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक क्षेत्राला झळाळी...
गिनिज बुक’मध्ये झळकला चंद्रपूर जिल्हा हजारो दिव्यांच्या रोशनाईने उजळलेले ‘सियावर रामचंद्र की जय’ हे शब्द आणि हिरव्या रोपट्यांनी सजलेली ग्रीन भारतमाता या दोन्ही उपक्रमांमुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. अफजल खानाचा कोथडा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी काढला ती ऐतिहासिक वाघनखे भारतात परत आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. शिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील काष्ठ अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर व संसद भवनासाठी वापरणे, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ ला राज्यगीताचा दर्जा देण्यातही ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे दुर्लक्षित राहिलेल्या सांस्कृतिक क्षेत्राला झळाळी मिळाली.