त्या कॉल मुळ उपमुख्यमंत्री फडणवीस आणि लोकसभा उमेदवार सातपुते अडचणीत? CONGRESS ची निवडणूक आयोगाकडे तक्रार

त्या कॉल मुळ उपमुख्यमंत्री फडणवीस आणि लोकसभा उमेदवार सातपुते अडचणीत? CONGRESS ची निवडणूक आयोगाकडे तक्रार

NEWS15 मराठी रिपोर्ट - सोलापूर

देशात लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने; सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारी करण्यात गुंतले आहेत. नामांकन आणि प्रचार-प्रसार सुरू आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने निवडणूक रॅलींमध्ये कोणत्याही प्रकारची वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधाने करण्याबाबत यापूर्वीच कडक सूचना दिल्या आहेत. असे असूनही पक्षाचे नेते अशा वक्तव्यापासून परावृत्त होत नाहीत. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

तर अशातच काँग्रेसने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केलीय. त्यामुळं त्या एका कॉल मुळ उपमुख्यमंत्री फडणवीस आणि लोकसभा उमेदवार सातपुते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांनी मोची समाजाचा प्रश्न फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला.  त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आमदार सातपुते काही लोकांसोबत बसून फडणवीस यांच्याशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये ते मोची समाजातील लोकांवर आयपीसी कलम 353 अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याबाबत बोलत आहेत.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. त्यात पत्रात लोंढे यांनी गृहमंत्री फडणवीस यांची पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आदर्श आचारसंहिता लागू असताना मतदारांना प्रलोभन दाखवणे, आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागे घेता येत नाहीत. तरीही मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केलेली आहे, असा दावा लोंढे यांनी पत्रात केला आहे. दरम्यान, मोची समाजातील व्यक्तींवरील गुन्हे आजपर्यंत मागे का घेतले नाहीत? या गुन्ह्यांची आठवण यांना निवडणुकीतच कशी झाली? गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी देवेंद्र फडणवीस निवडणुकीचा वाट पाहत होते काय? असे प्रश्न काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात विचारले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा गैरवापर केला आहे, त्यामुळे त्यांना गृहमंत्रिपदावरून तत्काळ हटवावे. तसेच, राम सातपुते यांची सोलापूरची भाजपची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.