महाविकास आघाडीच्या यशामुळे खेड तालुक्यातील नेत्यावर कोणता झेंडा घेऊ हातीची परिस्थिती...!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड(राजगुरूनगर): राज्यातील लोकसभेचे निकाल हाती आले आहेत आणि त्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने सध्या महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांच्यामध्ये मोठी चलबिचल सुरु झाली आहे.
राज्यात महायुतीला अपेक्षित असं यश न मिळाल्याने महायुतीतील भाजपा, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादीतील नेत्यामध्ये हिच परिस्थिती जर विधानसभेपर्यंत राहिली तर आपल्या राजकीय कारकिर्दीला धक्का तर पोहचणार नाही ना? अशी धाकधूक त्यांच्या मनात सुरु झाली आहे. त्यातच खेड-आळंदी विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मोठे मताधिक्य भेटल्याने महायुतीच्या बऱ्याच नेत्यावर कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुका पासून भाजपाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेख हा खाली आला नसल्याचे दिसून येते. त्यातच महाविकास आघाडीने सर्व घटक पक्षाचा समन्वय, उत्तम नियोजन आणि जनतेला भावणारे मुद्दे यावर निवडणूक लढल्याने त्यांच्या राज्यात मोठ्या संख्येने जागा आल्या. त्यातुलनेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यापासून ते तळातील कार्यकर्ते यांनी अतिउत्साही पणा दाखवून आम्हीच येणार, कोण कस येतोय तेच बघतो, बूथ लावून देणार नाही, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याना चुकीच्या पद्धतीने नोटीसा, प्रशासनाला हाताशी धरून दबाव तंत्र अशा एक ना अनेक क्लुप्त्या लढवून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. पण हे कुठे तरी सर्व सामान्य जनतेला न रुचणारे ठरले. आणि जनतेने मतदानातून महायुतीला तसे दाखवूनही दिले.
या लोकसभा निकालाचा थेट परिणाम स्थानिक नेत्यावर झाला आणि त्यांची मोठी घुसमट होऊ लागली. त्यात महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटातील अनेक नेते खेड तालुक्यात शरद पवार यांची तुतारी किंवा उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहींनी तर महायुतीत असूनही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतांचा जोगवा वाढला. तर काहींनी महायुतीचे प्रामाणिक काम करूनही तुम्ही काही केलेच नाही अशी त्यांच्यावर टिका होऊ लागली आहे. त्यामुळे आता संधी आहे आणि महाविकास आघाडीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने बरेच भाजपा, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी मधील नेते व कार्यकर्ते पक्षाला व आपल्या नेत्यांना रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा खेड तालुक्यात रंगू लागली आहे. त्यात शिंदे गटाचे दोन मोठे नेते महाविकास आघाडीतील घटक पक्षात प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे. तर काही अजित पवार राष्ट्रवादी मधील अन भाजपा मधील असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे सध्या तरी सगळे महायुतीचे नेते वेट आणि वॉचच्या भूमिकेत दिसतात. पण त्यांच्यापुढे महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षात जावे यासाठी कोणता झेंडा घेऊ हातीची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सध्यातरी दिसत आहे. पुढील काही दिवसात कुणाचा प्रवेश कुठे होतो हेच पहावे लागेल.