शिरूर अनंतपाळ तालुक्यात शिक्षण सप्ताहास प्रारंभ.!

शिरूर अनंतपाळ तालुक्यात शिक्षण सप्ताहास प्रारंभ.!

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ

लातूर  : विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामान्यज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी कानेगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण सप्ताह राबवण्यात येत आहे. या सप्ताहात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान विषयक उपक्रमाबरोरच लोकसहभागातून शाळेत नवोपक्रम घेण्यात येणार आहेत.दि.२२ ते २८ जुलैदरम्यान हा शिक्षण सप्ताह राबवला जाणार आहे. शाळेत सात दिवसात प्रत्येक दिवशी नवी संकल्पना घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांमधील कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हा शिक्षण सप्ताह घेण्यात येणार आहे.

असे असतील उपक्रम...

- पहिल्या दिवशी पाणी कसे वाचवायचे आणि इतरांना कशी मदत करायची, या विषयावर आधारित पोस्टर बनविणे, तसेच विज्ञान, गणित या विषयावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. यासोबतच शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्टॉलदेखील मांडण्यात येतील.

- दुसऱ्या दिवशी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस साजरा केला जाईल. यानिमित्ताने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान याचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तके वाचनाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये एक तास घेतला जाईल.

- तिसऱ्या दिवशी शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस म्हणून क्रीडा दिन साजरा केला जाईल. यात स्वदेशी खेळाचे महत्त्व सांगितले जाईल.

- चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिवस साजरा केला जाईल. यामध्ये प्रामुख्याने विविध भाषा, वेशभूषा, चित्रकला आदी पारंपरिक कला यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

- चौथा दिवस कौशल्य दिवस म्हणून साजरा होईल. माध्यमातून कौशल्य शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले जाईल.

- पाचवा दिवस शिक्षणातील तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा होईल. यात डिजिटल शिक्षणाचे फायदे सांगितले जातील.

- सहाव्या दिवशी पर्यावरण, वृक्षारोपण, रोपांचे संगोपन आदींसंदर्भात माहिती आणि जनजागृती केली जाईल. अखेरच्या सातव्या दिवशी समुदाय सहभाग दिवस हा साजरा केला जाणार आहे. या शिक्षण सप्ताहाचे नियोजन मुख्याध्यापक गंगाधर बोरुळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश भंडारकोटे, उपाध्यक्ष गणेश सुरवसे  यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक सुशीलकुमार पांचाळ, शाळेतील उपक्रमशील शिक्षिका  राधाबाई येडले, प्रशांत जाधव, चंद्रसेन ढगे, शरद येडले व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य करीत आहेत.