दिंडोरी लोकसभेसाठी गावितांना संधी द्या; माकप कार्यकर्त्यांची मागणी...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
गेल्या अनेक दिवसांपासून दिंडोरी लोकसभेसाठी माकपचे माजी आमदार जे. पी. गावित निवडणूक लढवणार असे बोलले जात होते. याबाबत गेल्या काही दिवसांपासून खलबते सुरू होती. त्यानुसार गावित यांनी अखेर आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत दिंडोरी लोकसभा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
शुक्रवार दि.१९ रोजी सायंकाळी दिंडोरी येथील नाशिक - कळवण रस्त्यावरील सीडफार्म येथे गावित यांनी पेठ, सुरगाणा, कळवण दिंडोरी, नांदगाव आदींसह इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका मांडली.
यावेळी गावित यांनी सांगितले की, याआधी मी निवडणूक लढवण्यास उत्सुक नव्हतो.! परंतु, विद्यमान खासदारांना मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यात अपयश आले असल्याने मतदारसंघातील लोकांनी मला निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे सांगत; त्यांनी यावेळी भाजपावर टीका केली. याशिवाय महाविकासआघाडी बाबत ही गावित त्यांनी नाराजी व्यक्त करून, आघाडीच्या नेत्यांनी परस्पर उमेदवार जाहीर केला असून, अजूनही वेळ गेलेली नाही आघाडीच्या नेत्यांनी पुनर्विचार करून मला उमेदवारी द्यावी असेही त्यांनी मेळाव्यात सांगितले.
यावेळी सिटीचे नेते डॉ. डी.एल.कराड यांनी सांगितले की माकपाचा संपूर्ण महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला पाठिंबा असून, त्याचा फायदा महा विकास आघाडीच्या उमेदवारांना फायदा होणार आहे. तेव्हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ माकपाला सोडून गावीताना संधी द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले. या मेळाव्यास माकपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.