मिरेगावच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट...
![मिरेगावच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_6572b5a5679bf.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा
लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथे सोनाक्षी बहुद्देशीय संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शासनाने ठरवून दिलेल्या मापदंडानुसार धान खरेदी न करता अतिरीक्त धान व हमालीची जास्त रक्कम वसूल करून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे सांगितले जात आहे. या संस्थेने खरेदी आदेशापूर्वी हजारो क्विंटल धान खरेदी करून गोदामात साठवण केल्याच्या वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या असताना सुद्धा जिल्हा पणन अधिकाऱ्याने चौकशीचे सौजन्य दाखविले नसल्यामुळे त्यांचे छत्रछायेखाली तर असला प्रकार सुरू नाही ना ? असा संभ्रम निर्माण होत असल्यामुळे जिल्हा पणन अधिकाऱ्याने सोनाक्षी बहुद्देशीय संस्थेमार्फत संचालित आधारभूत धान खरेदी केंद्राची चौकशी करून कारवाई करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
खरीप हंगामातील मुख्य पीक धान असून धान उत्पादक शेतकरी पीक कर्जाचे माध्यमातून धानासाठी आवश्यक बि-बियाणे, खते, कीटकनाशके व मजुरीची व्यवस्था करतो. पीक आल्यानंतर विकून पीक कर्जाची परतफेड करीत असतो. पण खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने धान खरेदी केली जात असल्यामुळे धान उत्पादकांची लूट होत असल्याचे शासनाचे निदर्शनास आल्याने स्वयंसेवी संस्थांची कमिशनवर उपअभिकर्ता म्हणून नेमणूक करून त्यांचे मार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र चालविले जातात. या केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे बँक खात्यात शासनाकडून रक्कम जमा केली जात असल्याने धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यास शेतकरी प्राधान्य देतो. त्यामुळे जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्राची संख्या सातत्याने वाढत आहे.
सोनाक्षी बहुद्देशीय संस्थेचे मिरेगाव ते सासरा रस्त्यावर चुलबंद नदी लगत शेत शिवारात साठवण गोडाऊन असल्यामुळे सोनाक्षी बहुद्देशीय संस्थेने मिरेगाव येथे खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रासाठी जिल्हा पणन अधिकारी भंडारा यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांना २९ नोव्हेंबर २०२३ रोजी धान खरेदी ची परवानगी देण्यात आली होती. पण या संस्थेने २२ नोव्हेंबर २०२३ पासूनच धान खरेदी सुरू केल्याने मंजुरी आदेश मिळण्यापूर्वीच हजारो क्विंटल धान खरेदी केली होती. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याबाबद काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असल्या तरी यास केराची टोपली दाखवून सोनाक्षी बहुद्देशीय संस्थेने प्रति कट्टा ४२ किलो धान तथा हमाली प्रति क्विंटल ३० रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करून नियमबाह्य काम केले आहे. या संस्थेच्या गैरप्रकारच्या वर्तमानपत्रातून बातम्या प्रकाशित झाल्या असताना सुद्धा पणन अधिकारी सोनाक्षी बहुद्देशीय संस्थेची पाठराखण का करीत आहे ? हे न समजण्यापलीकडील आहे. अतिरिक्त धान व हमाली घेण्याबाबद अनेक शेतकऱ्यांशी भांडण झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या या संस्थेद्वारा संचालित धान खरेदी केंद्राची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.