धान पिकावर खोडकिडीचे संकट.! वातावरणातील बदलाचा परिणाम...

धान पिकावर खोडकिडीचे संकट.! वातावरणातील बदलाचा परिणाम...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी  मोठ्या प्रमाणात धनाची लागवड केली आहे. खरीप हंगाम नुकसानाचा ठरल्याने शेतकऱ्यांची भिस्त उन्हाळी हंगामावर आहे. मात्र रोवणी होताच खोडकिड्याचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने पिकावर रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. पीक वाढवण्यासाठी शेतकरी विविध प्रकारची महागडी कीटकनाशके मोठ्या प्रमाणावर फवारणी करीत आहेत. मात्र, खोडकिडीचा प्रकोप आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हे संकट आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या कृती विभागाकडून योग्य उपाययोजना व मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मात्र कृषी विभाग याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.

 ✺कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट.

धनावर खोडकिडाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी कृषी केंद्राकडे धाव घेतली आहे. कृषी केंद्र चालकांनी दिलेली महागडी कीटकनाशके फवारणी करून सुद्धा पिकात सुधारणा होताना दिसत नाही. रोगराई व कीटकनाशकांच्या अपुऱ्या माहिती व नियोजनाअभावी कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याची दिसून येत आहे.