अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात.! शेतात साचले पाणीच पाणी...

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात.! शेतात साचले पाणीच पाणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे धान भिजले असून, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आठ दिवसात दोन वेळा पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता धान कापणी व मळणी सुरू आहे. त्यात पाच दिवसापूर्वी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या धान शेतात भिजला होता. तर हा धान वाळण्यासाठी म्हणुन शेतात शेतकऱ्यांनी तसाच ठेवला होता. परंतु, पुन्हा रात्री जोरदार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. 

तसेच दुरीकडे मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करून, नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची ग्वाही दिली. पण भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बऱ्याच गावांमध्ये अद्यापही अधिकारी घटनास्थळी पोहोचलेच नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन सरकार शेतकऱ्यांसाठी काय नवीन घोषण करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.