धक्कादायक घटना.! मुंबईकडे 55 प्रवासी घेऊन निघालेली खासगी बस भीषण आगीत स्वाहा...

धक्कादायक घटना.! मुंबईकडे 55 प्रवासी घेऊन निघालेली खासगी बस भीषण आगीत स्वाहा...

NEWS15 मराठी रिपोर्ट - कराड

मागील काही दिवसांपासून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागण्याच्या घटनेत वाढ होत असून, या अग्नितांडवात आत्तापर्यंत शेकडो प्रवाशांनी जीव गमावला आहे. समृद्धी महामार्ग किंवा हिंगोलीसह इतर ठिकाणच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एक अशीच घटना घडली असून, मिरजहून मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसला अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. ही आग लागली तेव्हा 55 प्रवाशी ह्या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजहून मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसला अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. तासवडे (ता. कराड) येथील टोलनाक्यानजीक पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील बसमधून एकूण ५५ प्रवाशी प्रवास करत होते. तासवडे टोल व्यवस्थापन, महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी व तळबीड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत केलेल्या मदतकार्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. डाॅल्फीन कंपनीची खासगी प्रवासी वाहतूक बस (क्रमांक- एम.एच. ०३-सी.पी. ४५००) ही काल रात्री प्रवासी घेऊन मिरजहून मुंबईकडे निघाली होती. दरम्यान ही बस पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबईकडे जात असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही बस कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यानजीक आल्यानंतर या बसला पाठीमागील बाजूस आग लागल्याची माहिती पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बस चालकासह इतर वाहनधारकांनी बस चालकासह प्रवासी व तासवडे टोल व्यवस्थापनाला दिली. अल्पावधीतच बसने आगीचे रौद्ररूप धारण केल्याचे सर्वांना दिसत होते. दरम्यान, त्यावेळी तासवडे टोलचे शिफ्ट इन्चार्ज नवनाथ साळुंखे यांनी आपल्या टोल कर्मचारी सहकाऱ्यांच्या व महामार्ग पेट्रोलिंग विभागाचे कर्मचारी फैय्याज शेख, हिंदुराव चव्हाण, सचिन जाधव, योगेश पाटोळे, ऋषिकेश साळुंखे, प्रदीप काळे व तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून गाडीतील प्रवाशांना खाली उतरले.त्यानंतर तात्काळ मदतकार्यासाठी नजीकच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर केवळ अर्ध्या तासातच कराड नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर पोहचली.

अग्निशामक दलाची गाडी वेळेत आल्यानंतर सुमारे तासभर सुरु असलेली आग काही वेळातच आटोक्यात आली. बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे.