राजकीय दिवाळखोरी? खेड बाजार समिती सभापतींची 'सोयीची' निष्ठा; स्वपक्षाला डावलून आमदारांच्या आडोशाला..?

राजकीय दिवाळखोरी? खेड बाजार समिती सभापतींची 'सोयीची' निष्ठा; स्वपक्षाला डावलून आमदारांच्या आडोशाला..?

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

खेड : राजकारणात निष्ठा महत्त्वाची असते, मात्र खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे यांच्या बाबतीत 'निष्ठा' हा शब्द केवळ सोयीपुरताच उरल्याचे चित्र दिसत आहे. २ जानेवारीला शिवसेनेच्या (शिंदे गट) मुलाखतीला हजेरी लावायची आणि ५ जानेवारीच्या कार्यक्रमात स्वपक्षाच्या नेत्यांनाच बॅनरवरून बाद करायचे, अशा विजय शिंदेंच्या 'दुटप्पी' भूमिकेमुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पक्षाशी गद्दारी की अस्तित्वाची लढाई?

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गळ्यातील पक्षाचा गमछा काढून फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिंदेंची नाचक्की झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बॅनरवरून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो गायब करून केवळ आमदार बाबाजी काळे यांचा फोटो लावला आहे. यामुळे "खातो एकाचं आणि गातो दुसऱ्याचं" अशी त्यांची अवस्था झाल्याची चर्चा पिंपळगाव-मरकळ गटात रंगली आहे. स्वतःच्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यानेच ते आमदारांच्या आडोशाला लपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सी.एस.आर फंड हा जनतेच्या किंवा गाव विकासासाठी वापरला जात असताना सभापती यांनी स्वतःची निवडणूक डोळ्या समोर ठेऊन त्यातही राजकीय स्वार्थ साधल्याचे बोलले जात आहे.

'ना घर का ना घाट का' अवस्था..

शिंदे शिवसेनेने पिंपळगाव-मरकळ गटासाठी श्रीनाथ लांडे या तरुण आणि जनमानसात मिसळणाऱ्या चेहऱ्याला पसंती दर्शवल्याने विजय शिंदे यांचे धाबे दणाणले आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारण्याचे संकेत दिल्याने आता 'आयात उमेदवार' म्हणून स्वतःची ओळख पुसण्यासाठी ते धडपडत आहेत. मात्र, कधी 'सर्वपक्षीय' तर कधी 'फक्त आमदार समर्थक' अशी भूमिका घेतल्याने त्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशी झाली आहे.

जनतेत संभ्रम आणि रोष..

सी.एस.आर फंडातील घंटागाडी आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचा वापर ते केवळ स्वतःच्या राजकीय मार्केटिंगसाठी करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

* आर्थिक सुबत्ता की जनसंपर्क? निवडणुकीत केवळ पैशाच्या जोरावर बाजी मारता येते, या भ्रमात सभापती वावरत असल्याची टीका होत आहे.

* लोकांमध्ये संभ्रम: आज एका पक्षाची मुलाखत द्यायची आणि उद्या दुसऱ्याच नेत्याचे गुणगान गायचे, अशा धरसोड वृत्तीमुळे मतदार त्यांच्याकडे 'संधीसाधू' राजकारणी म्हणून पाहत आहेत.

राजकीय कारकिर्दीला 'ब्रेक' लागण्याचे संकेत..

विद्यमान आमदारांच्या मागे फिरून आपली राजकीय कोंडी फोडण्याचा त्यांचा प्रयत्न किती यशस्वी होईल, हे येणारा काळच सांगेल. मात्र, पक्षादेशाला हरताळ फासून आणि वरिष्ठ नेत्यांचा अपमान करून विजय शिंदे यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला स्वतःच खिळ घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांची ही 'राजकीय मशाल' निवडणुकीपूर्वीच विझणार की म्यान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे