राजकीय : खेड-आळंदी विधानसभेत शिंदे शिवसेनेची महाविकास आघाडीला उघड मदत,जिल्हाप्रमुख,उपनेते यांचे हे अपयश म्हणायचे का?

राजकीय : खेड-आळंदी विधानसभेत शिंदे शिवसेनेची महाविकास आघाडीला उघड मदत,जिल्हाप्रमुख,उपनेते यांचे हे अपयश म्हणायचे का?

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खेड-आळंदी विधानसभेत शिंदे शिवसेनेने उघडपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत केल्याने खेड तालुक्यात शिंदे शिवसेनेची पूर्णतः वाताहात झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिंदे शिवसेनेच्या या वाताहातिला पूर्णतः जिल्हा प्रमुख व उपनेते जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

या अगोदरच ज्यावेळी शिंदे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर गेले त्यावर जिल्हा प्रमुख व उपनेते यांनी बघ्याची भूमिका घेऊन त्यांच्यावर कारवाई न करता फक्त कारवाई कुणासाठी करायची असा प्रश्न उपस्थित केला. पण महायुतीच्या उमेदवाराच्या बरोबरचे वैयक्तिक हेवेदावे धरून जिल्हा प्रमुख व उपनेते यांनी त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी चुकीचे वागूनही फक्त बघ्याची भूमिका घेतली. या उलट युतीचा धर्म न पाळता ज्या व्यासपीठावर युतीच्या नेत्यांवर टिका केली जात होती त्याच व्यासपीठावर शिंदे शिवसेनेचे जबाबदार पदाधिकारीहि आवेशाने भाषणे करत असल्याचे दिसून आले.

इकडे महायुतीचा धर्म जिथे पाळला गेला नाही तिथे पक्षांनी पदाधिकारी यांच्यावर त्या त्या पातळीवर कारवाई करण्यात आली. पण खेड-आळंदी विधानसभेत स्वतःच्या नेत्यांवर टिका करूनही जिल्हा प्रमुख व उपनेते यांनी पदाधिकारी यांच्यावर कारवाई तर सोडा साधी लेखी स्वरुपात विचारणाही केली नाही. पण यामुळे तालुक्यात शिंदे शिवसेनेची पूर्णतः वाताहात झाल्याचे दिसून आले.

खेड तालुक्यातील पदाधिकारी एवढ्यावरच थांबले नाही तर ते महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवाराच्या विजय जल्लोशातही सामील झाल्याने नक्की शिंदे शिवसेना खेड तालुक्यात उरली आहे कि नाही? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुन्हा महाविकास आघाडीसाठी काम केलेले शिंदे शिवसेनेचे नेते लाभाच्या पदांसाठी दावा करतील आणि पुन्हा त्यांना ती पदेही दिली जातील. असे झाले तर प्रामाणिक कार्यकर्ते यांनी फक्त यांच्या सतरंज्याच उचलायच्या का? असा प्रश्न विचारण्याची वेळ प्रामाणिक कार्यकर्ते यांच्यावर आली आहे.  हे नेते जर पक्षाचा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी व लाभाच्या पदांसाठी उपयोग करत असतील तर,यावरून हे पदाधिकारी पक्षाचा फक्त कामापुरताच उपयोग करणार का? हेही न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल. खेड तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे एकूण प्रमुख १० ते १२ पदाधिकारी यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यात काही लोकप्रतिनिधी यांचाही समावेश होतो. एवढे पदाधिकारी यांनी पक्षाची चौकट डावलून मनाप्रमाणे पक्षाच्या विरोधात काम केले असेल तर त्यांची खरंच पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रामाणिक निष्ठा कशी असेल आणि ते यापुढेही एकनाथ शिंदे यांच्या बरोबर प्रामाणिक काम कसे करतील यावर न बोललेलं बर ..

खेड तालुक्यातील शिंदे शिवसेनेत असेही नेते आहेत कि, त्यांना पक्ष संघटनेचे काही देणे घेणे नाही फक्त पक्षाच्या वाट्याला आलेली लाभाची पदे घ्यायची आणि ती वाचविण्यासाठी प्रयत्न करायचे एवढाच अजेंडा घेऊन काही नेते या पक्षात काम करत असल्याचे प्रामुख्याने निदर्शनास येते. यामुळे कुठे तरी तालुक्यात पक्ष खीळखिळा झाला आहे. पक्षाची बांधणी करणे वा पक्षातील पदाधिकारी यांना पक्ष शिस्तीत ठेवण्याचे काम जिल्हा प्रमुख व उपनेते यांचे असते.ते पक्षाच्या रचणेनुसार या दोन नेत्यांचे आहे पण त्यांनी कुणी कुठेही जा, आम्ही काही बोलत नाही आणि आम्ही कारवाई तर करतच नाही असा अजेंडा राबविण्याचे ठरवले आहे. यामुळे महायुतीत तालुक्यात मोठी बिघाडी झाली असून शिंदे शिवसेनेची परिस्थिती एक नाही एकात आणि बाप नाही लेकात अशीच काहीशी झाली आहे. आता वरिष्ठांनी या बेजबाबदार पदाधिकारी यांची तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर पक्ष शिस्त भंगाची कारवाई करण्याची मागणी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्ते करत आहेत. एवढे होऊनही वरिष्ठ नेते जर बघ्याची भूमिका घेत राहिले तर खेड तालुक्यातील शिंदे शिवसेना महाविकास आघाडीच्या दावणीला गेल्या शिवाय राहणार नाही. यावर वरिष्ठ नेते व डोळ्यावर पट्टी बांधलेले जिल्हा प्रमुख व उपनेते काय भूमिका घेणार हे पहावे लागेल.