खेड तालुक्यातील पोलिस पाटील पदाच्या परीक्षेला स्थगिती..!

खेड तालुक्यातील पोलिस पाटील पदाच्या परीक्षेला स्थगिती..!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

खेड(राजगुरूनगर): खेड तालुक्यातील पोलिस पाटील पदाची परीक्षा पुढे ढकलली असल्याची माहिती खेड विभागाचे प्रांताधिकारी जोगेंद्र काट्यारे यांनी दिली आहे.

खेड तालुक्यातील एकूण २७ गावांची पोलिस पाटील पदाची परीक्षा १ ऑगस्ट रोजी होणार होती. पण पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी व मुसळधार पावसाच्या इशार्‍यामुळे व खेड तालुक्यातील काही गावांमधील पुणे रिंगरोड संपादित जमिनीची मोजणीची तारीख निश्चित केल्यामुळे त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच रोहकल येथील एमआयडीसी जमीन संपादना बाबत मोजणीची कार्यवाही व इतर प्रशासकीय कामकाज याच्या नियोजनामुळे पोलिस पाटील पदाची लेखी परीक्षा पुढे ढकलली असल्याची माहिती समोर आली आहे. 

खेड तालुक्यातील रिक्त पोलिस पाटील पदाच्या भरती बाबत काही दिवसापूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार सोमवार दिनांक २४ जुलै रोजी पात्र/अपात्र उमेदवारांची यादिही प्रसिद्ध करण्यात आली होती. पण काही प्रशासकीय कामाच्या अगोदरच्या नियोजनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेच्या बाबतचे सुधारित वेळ व ठिकाण याची माहिती सर्व उमेदवारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल अशी माहिती खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र काट्यारे यांनी दिली आहे.