नारायण राणेंसाठी राज ठाकरे घेणार प्रचार सभा? तर ठाकरेंना प्रत्यूत्तर ठाकरेच देणार...

नारायण राणेंसाठी राज ठाकरे घेणार प्रचार सभा? तर ठाकरेंना प्रत्यूत्तर ठाकरेच देणार...

NEWS15 मराठी रिपोर्ट -

राज्यातील बहुचर्चित पैकी लोकसभा मतदारसंघ म्हणजे; रत्नागिरी - सिंधुदूर्ग मतदारसंघ.! या मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात राणे परिवाराचे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे उभे ठाकले आहेत. दोन्ही पक्षांकडून आणि पक्षाच्या उमेदवारांकडून विरोधकांवर खालच्या भाषेत टीका टिप्पणी केली जात असून, अशातच आता या मतदारसंघात आदल्यादिवशी उद्धव ठाकरे यत दिसऱ्या दिवशी राज ठाकरे ह्यांची सभा होणार आहे त्यामुळं हा मतदारसंघ अधिक चर्चिला जात आहे.  

तसेच इच्छुक असलेले किरण सामंत हे त्यांच्या मंत्री भावावर कमालीचे नाराज झाले आहेत. यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. राणेंच्या मुलाचा दोनदा पराभव करून खासदार झालेले विनायक राऊत हे नारायण राणेंनाही हरवितात का, की नारायण राणे याचा बदला घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर उद्धव ठाकरेंची सभा ३ मे रोजी तर राज यांची सभा ४ मे रोजी होत आहे. उद्धव ठाकरेंची सभा आधीच ठरलेली होती. राज यांच्या पाठिंब्यानंतर राणे यांनी राज यांची सभा ४ मे रोजी कणकवलीतीलच दुसऱ्या मैदानावर ठेवली आहे. उद्धव ठाकरेंची सभा उद्या, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरच्या मैदानात होत आहे. आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष संदेश पारकर आदींनी या सभास्थळाची पाहणी केली आहे. 

तर राज ठाकरेंची सभा शनिवारी नगरपंचायत मैदानावर होत आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या सभास्थळाची पाहणी केली आहे. राज ठाकरेंच्या सभांचा आवाका पाहता हे मैदान अपुरे पडण्याची शक्यता आहे. आता या सभेला मनसेचे कार्यकर्तेच येतात की राणे समर्थकही येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे राज यांच्यावर टीका करतात की टाळतात याच्याबरोबरच उद्धव यांनी टीका केली आणि नाही केली तरी राज हे ठाकरेंवर टीका करतात का, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.