वाचन हाच यशाचा खरा मार्ग आहे - शरद शेजवळ

वाचन हाच यशाचा खरा मार्ग आहे - शरद शेजवळ

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

वाचन माणसांना सर्वार्थाने सशक्त बनवते पण त्याची सवय ही बालपणापासूनच लागायला हवी. ज्याप्रमाणे आपल्या आहारातील पदार्थ आपले आवडते असतात तशीच पुस्तकंही आपल्या आवडीची असायला हवीत.बालपणापासूनच खूप वाचायला हवे कारण भविषयातील सर्व यशाचे मार्ग हे वाचनातूनच निर्माण होतात. वाचन हाच यशाचा खरा मार्ग आहे असे प्रतिपादन जनता इंग्लिश स्कुल दिंडोरीचे प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले. 

ते शिक्षण विभाग पंचायत समिती दिंडोरी आयोजित महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत भव्य ग्रंथ प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी होते. 

शेजवळ पुढे म्हणाले की, ग्रंथ प्रदर्शन हे एखाद्या शाळेत आयोजित करणे म्हणजे मुलांसाठी खाऊचे पेटारे उघडण्यासारखे आहे.आपण मोठ्यांनीही मुलांना काय वाचावे हे स्वकृतीतून सांगायला हवे. आजकाल सर्वजण वाचनापासून दूर जाऊन मोबाईल आणि टेलिव्हिजनच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देत आहोत.चंद्रकांत गवळी यांनी वाचनाचे व पुस्तकाचे महत्त्व विशद करताना वाचन महोत्सव चळवळीची उद्दिष्टे सांगितली.

दुपार सत्रात दिंडोरी तालुक्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षक कवींचे कविसंमेलन कवी संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.यात राजेंद्र उगले, अरुण इंगळे,पंकज गवळी, श्रीमती बिरारी आदींनी आपल्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. ग्रंथ प्रदर्शनासाठी वैशाली प्रकाशन पुणे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, सुनीता अहिरे, सर्व केंद्रप्रमुख, मॉडेल स्कुलचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी कैलास पगार यांनी केले. तर उदघाटन सत्र,कविसंमेलन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी केले.प्रकाशक विलास पोतदार यांनी आभार मानले.