मोदी आवास' योजनेच्या घरकुलांचे बांधकाम रखडले; पूर्ण कधी होणार?
![मोदी आवास' योजनेच्या घरकुलांचे बांधकाम रखडले; पूर्ण कधी होणार?](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66e8131a169a7.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
ओबीसी प्रवर्गातील गरजूंना विनाविलंब घरकुलांचा लाभ मिळावा, यासाठी मोदी आवास योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यानंतर सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थीची निवडही करण्यात आली. परंतु निवड झालेल्या लाभार्थीच्या यादीला मंजुरी मिळून कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आले. त्यानंतर मंजूर लाभार्थीना पहिला टप्पा १५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. अनेकांनी स्वतःचे जुनी घरे उस्तरून बांधकामाला सुरुवात केली. अनुदानाचा दुसरा टप्पा अनुदान अद्यापही जमा झाले नसल्याने मोदी आवास घरकुलाचे बांधकाम रखडले आहे.
इतर मागास प्रवर्गातील गरजूंना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून मोदी आवास योजना प्रथमच सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थीना हक्काचे घर बांधकाम करण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पंचायत समितीला मोदी आवास योजनेंतर्गत १७० घरकुल मंजूर आहेत. दिंडोरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोदी आवास योजनेच्या पात्र लाभार्थीची निवड करण्यात आली. निवड झालेले पात्र लाभार्थी अनुदानासाठी दररोज पंचायत समिती बांधकाम विभागाच्या पायऱ्या झिजवत आहेत. परंतु पंचायत समितीमध्ये निधीच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमच सुरू झालेल्या मोदी आवास योजनेला निधीअभावी ब्रेक लागला आहे. पावसाळ्यापूर्वीच घरकुल बांधकाम पूर्ण करून हक्काच्या घरात प्रवेश करणार,असे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थीचे अनुदानाअभावी 'स्वप्नातच' घर राहिले आहे. घर बांधकामासाठी कधी वाळू वेळेवर मिळत नाही तर कधी अनुदान, अशी परिस्थिती असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.
अर्धवट बांधकामामुळे संसार उघड्यावर...
तालुक्यात बहुतांशी आदिवासी लोकसंख्या असल्याने ओबीसी प्रवर्गाला कधीही घरकुल मिळाले नाही,परंतु मोदी आवास योजनेंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थीना पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. त्यानंतर सहा महिने होऊनही अनुदान मिळाले नाही, घराचे अर्धवट काम असल्याने संसारही उघड्यावर आला आहे, असे काही लाभार्थ्यांनी सांगितले,
प्रतिक्रिया.!
घरकुल कामे प्रगतिपथावर; मोदी आवास योजनेत १७० घरकुल मंजूर आहेत. लाभार्थीच्या खाती पहिला हप्ता पडला आहे. घरकुल कामेदेखील प्रगतिपथावर आहेत. लवकरच घरकुल लाभार्थीच्या खात्यात अनुदान रक्कम जमा होणार आहे.
नम्रता जगताप, गटविकास अधिकारी, दिंडोरी