तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढणार...!

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढणार...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : तळेगाव -चाकण -शिक्रापूर रस्त्याच्याकडेला खराबवाडी, महाळुंगे, खालुब्रे या ग्रामपंचायतींच्या हद्दीत जी अतिक्रमणे करण्यात आली आहेत ती दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्याकडून पोलीस बंदोबस्तात काढली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता हा राज्यातील अत्यंत महत्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. या महामार्गावरून मुंबईकडे जाणारी औद्योगिक व इतर वाहतूक केली जाते. याच रस्त्यावर असणाऱ्या खराबवाडी, महाळुंगे, खालुब्रे गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे व अनधिकृत बांधकाम झाल्याचे दिसून येत आहे. या अतिक्रमणामुळे रस्ता सोडून इतरत्र वाहतुकीच्या वाहनाना उतरण्यासाठी जागा नसल्याने या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यातच रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डेही पडले आहेत. यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या पत्राच्या अनुषंगाने तळेगाव-चाकण-शिक्रापूर राज्य महामार्ग ५५(नवीन राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८D) या रस्त्याची दुरुस्तीच्या मंजूर कामास कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या कामाचा बांधकाम कालावधी सहा महिने असून रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने काम पूर्ण झाल्यानंतर ०३ वर्षा पर्यँत करावयाचे प्रस्थावित आहे. त्यानुसार रस्त्याचे काम विभागामार्फत सुरु झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिली.

सदर रस्त्याचे काम करण्यासाठी वेळोवेळी सूचना करूनही अतिक्रमणे काढण्याची तसदि नागरिक घेत नसल्याने आता स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस संरक्षण घेऊन उर्वरित अतिक्रमण काढणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

रस्त्याच्या कड़ेची अतिक्रमने काढण्याच्या अगोदर शासनाच्या वहिवाटीतील रस्त्याच्या हद्दीत (ROW) करण्याचे काम सुरु झाले आहे. यातून नक्कीच वाहतूक कोंडीचा २०/३० टक्के वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे. काही नागरिकांनी स्वतः हुन पुढे येऊन शासन जागेवरील अतिक्रम केलेली जागा मोकळी करून दिल्या आहेत. पण काही नागरिकांनी काय होत नाही या अविर्भावात राहून अतिक्रमने तशीच ठेवली आहेत त्यांच्या बांधकामावर येत्या ८ जानेवारीला हातोडा पडणार आहे. तीनही गावातील कारवाई एकाच दिवशी होते की ही कारवाई पुढे किती दिवस सुरु राहते हेच पहावे लागेल.