तिल्लोळी एसएनएफ वाचनालयातील सहा मुलांची शासकीय पदांवर निवड...
![तिल्लोळी एसएनएफ वाचनालयातील सहा मुलांची शासकीय पदांवर निवड...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_66018cf2236bf.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी गावात सोशल नेटवर्कींग फोरम आणि ग्रामपंचायतच्या योगदानातून गेल्याच वर्षी सुरू झालेल्या वाचनालयातील सहा विद्यार्थी विविध शासकिय पदांच्या परीक्षांमध्ये यशस्वी ठरले आहेत.या मुलांनी एसएनएफ वाचनालयातील पुस्तकं आणि सुविधांचा लाभ घेत अथक परिश्रम करत हे यश मिळवल्याने परिसरात कौतूकाचा वर्षाव होत आहे.
जगदीश खिल्लार हा विद्यार्थी (कृषी सहाय्यक व ग्राम महसूल अधिकारी), दिगंबर भरसट - (सार्वजनिक आरोग्य), ज्ञानेश्वर खिल्लार - (जिल्हा परिषद शिक्षक), गणेश चौधरी- (अग्नीवीर), पुंडलीक भरसट- (जि.प शिक्षक), शंकर गांगोडे-(आरोग्य विभाग) अशी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. विद्यार्थ्यांचे हे यश संपूर्ण एसएनएफ परिवार आणि ग्रामस्थांसाठी अत्यांनंदाची बातमी ठरली आहे.एसएनएफ वाचनालय संकल्पना सुरू झाल्यापासून गेल्या तीन चार वर्षात सोशल फोरमच्या 20 वाचनालयांमधील 40 पेक्षाही अधिक मुलांची विविध शासकीय पदांवर निवड होणं ही आदिवासी भागात शैक्षणिक सुविधांची किती गरज आहे ही बाब हे अधोरेखीत करतं. त्यामुळे एसएनएफच्या पदाधिकार्यांनी आता ही वाचनालय /अभ्यासिका चळवळ अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला आहे.
या वाचनालयाला मदत करणारे अमेरिकेतील योगेश कासट (रियल डायनॅमीक्स) सरपंच मनिषा भरसट, उपसरपंच दशरथ बुरंगे,सर्व सदस्य ग्रामसेवक आर.व्ही.मिस्तरी, मुख्याध्यापक,शिक्षक,एसएनएफ दिंडोरी तालुका समन्वयक जयदीप गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.परिसरातील नागरिकांनीही मुलांचे कौतूक केले. वाचनालय नियमीत चालू ठेवण्यात तालुका समन्वयक रामदास शिंदे,जयदीप गायकवाड,विजय भरसट,संदिप बत्तासे,डाॅ.निलेश पाटिल,सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे योगदान आहे.
प्रतिक्रिया
"माझी दोन पदांवर निवड झाली आहे.
शेती करून रात्री अभ्यास करत मिळालेल्या या यशात आईवडिल, बहिण-मेहूणे,शिक्षक आणि एसएनएफ वाचनालयातील पुस्तकांचा फार मोठा वाटा आहे. यानंतर परिसरातील इतर मुलांनाही मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे."
जगदीश खिल्लार - (यशस्वी विद्यार्थी)
एसएनएफ वाचनालयासाठी योगदान देणाऱ्या उद्योजक व्यावसायिक सदस्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. १५०० हुन अधिक विद्यार्थी वाचनालयाचा लाभ घेत आहे. याशिवाय वाचनालय स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच तज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन वेळोवेळी देण्यात येत असल्याने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत यशस्वी होत आहे.
प्रमोद गायकवाड - (अध्यक्ष एसएनएफ)