सोलापुर.! एकदिवसीय दिव्यांग संसद संपन्न, समाज कल्याण अधिकारी खमीतकर यांची हटके संकल्पना...

सोलापुर.! एकदिवसीय दिव्यांग संसद संपन्न, समाज कल्याण अधिकारी खमीतकर यांची हटके संकल्पना...

NEWS15 प्रतिनिधी :  प्रवीण मखरे

सोलापूर : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एकदिवशीय दिव्यांग संसदेचे आयोजन शनिवार 3 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशिय सभागृहात करण्यात आले. प्रहार क्रांती संघटना, महाराष्ट्र दृष्टीहीन संघ, जिल्हा शाखा सोलापूर यांनी यात विशेष सहभाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी त्यांनी दिव्यांगांमधील विशेष क्षमतेचे कौतुक करुन, दिव्यांगांच्या सदैव पाठिशी असल्याचे सांगितले.

जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा जिल्हा सत्र न्यायालयातील वरिष्ठस्तर न्यायाधीश नरेंद्र जोशी व  मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या हस्ते हेलन केलर व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दिव्यांग संसदेचे उद्घाटन झाले. दिव्यांग बांधवांना बोलावून त्यांच्याही हस्ते यावेळी दीपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान सामान्यांपेक्षा अधिक कार्यक्षमता दिव्यांगांमध्ये असल्यामुळे त्यांना दिव्यांग म्हणण्याऐवजी विशेष सक्षम म्हणणे उचित ठरेल, असे न्यायाधीश जोशी यांनी सांगितले.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, ॲड. लक्ष्मण मारडकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यावेळी उपस्थित होते. प्रास्तविक भाषणात जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर म्हणाले, निसर्गाने केलेला अन्याय आणि अर्थिक विवंचना या दोन संकटांचा सामना दिव्यांग बांधव करतात मात्र समाज कल्याण विभाग कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

या एकदिवसीय दिव्यांग संसदेत दिव्यांगासाठी आवश्यक असणाऱ्या दाखले, दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र, विधि सेवा प्राधिकारणामार्फत दिव्यांगाना मोफत कायदयाबाबत सल्ला व मार्गदर्शन,  दिव्यांगाना येणाऱ्या विविध समस्या व अडचणी, दिव्यांगासाठी असणारे लघू व सुक्ष्म उद्योग याबाबत मार्गदर्शन, दिव्यांगासाठी असणाऱ्या विविध व्यवसाय शिक्षणाबाबत मार्गदर्शन, अपंग वित्त विकास महामंडळातर्फे दिव्यांगाना असणाऱ्या विविध व्यवसायासाठी असणारे कर्ज योजनाबाबत मार्गदर्शन,  दिव्यांगासाठी असणाऱ्या रोजगार भांडवली योजनाबाबत मार्गदर्शन तसेच दिव्यांगासाठी असणारे विविध योजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.