एसटी बसची कंटेनरला मागून धडक.! एक प्रवाशी ठार 19 जखमी...
![एसटी बसची कंटेनरला मागून धडक.! एक प्रवाशी ठार 19 जखमी...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_65068dcd2fee1.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट - रायगड
गणपतीनिमित्त सध्या कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली असून, मागील काही दिवसांपासून ट्रेन, बस, टॅक्सी, खाजगी वाहनांची संख्या रस्त्यावर आणि रुळावर वाढली आहे. मात्र यातच एक धक्कादायक घटना समोर आली असून, गणपतीनिमित्त आप - आपल्या गावी घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला आहे. तर या दुर्दैवी घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे आणि 19 प्रवाशी जखमी तर त्यापैकी 2 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार; मुंबई - गोवा महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात झालाय. माणगावनजीक रेपोली येथे पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
अपघाताची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.
जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एसटी बसला हा अपघात झाला आहे. अपघातात बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.