चारित्र्यावर संशय .! आणि डोक्यात कुऱ्हाडीने वार करत, पतीनं संपवलं पत्नीचं आयुष्य...
NEWS15 प्रतिनिधी : जालना
महिलावरील अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, यातील काही घटनांनी महिलांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे. अशीच एक घटना अंबड तालुक्यातील शहागडमध्ये समोर आली असून, चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची हि घटना. तर पत्नीची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून संशयित आरोपी (पती) फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध चालू आहे.
पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार; अंबड तालुक्यातील शहागडमध्ये शुक्रवार सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली असून, ज्योती दिलीप भारस्कर वय 36 वर्षे रा. कोठाळा खु. ता. अंबड, ह.मु. डोंगरे वस्ती पैठण रोड शहागड असे मयत महिलेचे नाव आहे. तर आरोपी दिलीप गणपत भारस्कर हा फरार झालाय.
सविस्तर घटना अशी कि, मयत महिला ज्योती भारस्कर आणि दिलीप भारस्कर यांचा विवाह 14 वर्षापूर्वी झाला. लग्न झाल्यावर सुरुवातीला त्यांचा संसार चांगला चालला असून, या दरम्यान त्यांना ३ अपत्य झाली. मात्र, काही वर्षांपासून दिलीप भारस्कर हा ज्योती भारस्कर यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे यावरून त्यांच्यात वाद होत असे, तर सोबतच कौटुंबिक वादही सुरू होता. तसेच मागील काही दिवसांपासून दिलीप भारस्कर आणि ज्योती भारस्कर हे शहागड येथील डोंगरे वस्तीवरील वीटभट्टी येथे काम करीत होते. तर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ज्योती भारस्कर आणि दिलीप भारस्कर या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, दिलीप भारस्कर याने रागाच्या भरात थेट ज्योती भारस्कर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे ज्योती या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत शहागड पोलिसांना महिती मिळताच सपोनि. दीपक लंके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. तर या प्रकरणी महादेव विश्वनाथ वाल्हेकर यांच्या फिर्यादीवरुन संशयित दिलीप भारस्कर याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.