दुष्काळात तेरावा महिना.! गॅस सिलिंडर आहे की अर्धी हवा भरलेलं चिप्स पाकीट?

दुष्काळात तेरावा महिना.! गॅस सिलिंडर आहे की अर्धी हवा भरलेलं चिप्स पाकीट?

प्रतिनिधी: विश्वनाथ केसवड खेड 

गॅस सिलिंडर टंचाईमुळे आधीच हैराण झालेल्या जनतेच्या जखमेवर आता मीठ चोळणारी नवी समस्या समोर आली आहे. १४.२ किलो क्षमतेचा सिलिंडर घेतल्यानंतरही प्रत्यक्षात फक्त ८ ते १० किलो गॅस मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

घरगुती वापरासाठी घेतलेला सिलिंडर काही दिवसांतच संपत असल्याने महिलांपासून कामगार वर्गापर्यंत सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. आधीच गॅस मिळवण्यासाठी तासन्तास रांगा, त्यात काळाबाजार आणि आता वजनातही तफावत — त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हा गॅस सिलिंडर आहे की अर्धी हवा भरलेलं चिप्सचं पाकीट? असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक सिलिंडरवर ‘टॅर वेट’ (रिकाम्या सिलिंडरचे वजन) आणि ‘नेट वेट’ (गॅसचे वजन) स्पष्ट नमूद असते. ग्राहकांनी सिलिंडर घेताना वजन तपासणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वजनकाटेच उपलब्ध नसल्याने ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, प्रशासन आणि संबंधित गॅस कंपन्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन तपासणी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

*नागरिकांसाठी सूचना:*

सिलिंडर घेताना वजन जरूर तपासा...

सील (seal) नीट आहे का ते पाहा...

शंका असल्यास तत्काळ तक्रार नोंदवा...