खेड तालुक्यातील भाजपा नेत्याच्या प्रवेशाने उद्धव ठाकरे सेना नाराज, डॉ. कोल्हेच्या अडचणी वाढणार?

खेड तालुक्यातील भाजपा नेत्याच्या प्रवेशाने उद्धव ठाकरे सेना नाराज, डॉ. कोल्हेच्या अडचणी वाढणार?

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खेड तालुक्यातील भाजपा नेते अतुल देशमुख यांनी कालच(दि.११) रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पण अतुल देशमुखांच्या प्रवेशाने खेड तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाची सेना नाराज झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

या अगोदरही खेड तालुक्यातील कोणत्याही दौऱ्याला किंवा बैठकीला विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे विश्वासात घेत नसल्यामुळे अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या चाकण येथील आढावा बैठकीला उद्धव ठाकरे सेनेने पाठ फिरवली होती. त्यानंतर कुठे तरी लोकसभा निवडणुकीत उबाठा गट आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समेट होईल असे चित्र दिसत असताना. त्यात मिठाचा खडा पडला आणि कालच्या अतुल देशमुख यांच्या प्रवेशाने पुन्हा एकदा उबाठा गट आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. अतुल देशमुख यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या उबाठा सेनेच्या पदाधिकारी यांनी आज (दि.१२) रोजी सर्व पदाधिकारी यांची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकित नक्की उबाठा गट आपला महाविकास आघाडीचा धर्म पाळणार? की अमोल कोल्हे यांच्या अडचणी वाढवणार हेच पहावे लागणार आहे.

उबाठा सेनेचे पदाधिकारी यांनी आम्ही जीवाचे रान करून पक्ष संघटन वाढवले, पक्ष अडचणीत असताना आम्ही पक्षांचे प्रामाणिक काम करत आहोत. पण महाविकास आघाडीत तयार झाल्यापासून आमच्यावर कुठे तरी अन्याय होत आहे. एवढा अन्याय सहन करूनही आमच्या महाविकास आघाडीचा याठिकाणी खासदार असतानाही या अगोदरही आमच्यावर फक्त अन्यायचं झाला. आणि आता तालुक्यातील राजकीय समीकरणे ठरविताना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी आम्हाला विश्वासात न घेता तालुक्यातील नेत्यांना पक्ष प्रवेश देत असतील तर ही महाविकास आघाडी फक्त कागदावरच बरी असे म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही अशी उदिग्न भावना उबाठा गटाचे नेते बोलून दाखवत आहेत. 

ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर खेड तालुक्यातील उबाठा गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर नाराज झाल्याने याचा प्रत्यक्ष फटका महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना बसणार आहे. हे अमोल कोल्हे यांना परवडणारे नाही. उबाठा गटाच्या भूमिकेमुळे आजचा अमोल कोल्हे यांचा खेड तालुक्याचा प्रचार दौराही रद्द करण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे आता अमोल कोल्हे हे उबाठा गटाची नाराजी कशाप्रकारे दूर करणार, की नाराजी दूर करण्यासाठी स्वतः वरिष्ठ नेते खेड तालुक्यात लक्ष घालनार हेच पहावे लागेल.