लवकरच धावणार मुंबई - लातूर वंदे भारत ट्रेन? प्रवासाचा वेळही वाचणार...
NEWS15 मराठी - लातूर
रेल्वे प्रवास करणाऱ्यांसह लातूरकरारासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबई - लातूर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवासाचा मोठा वेळही वाचणारय.
तसेच मुंबई ते लातूर ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे लातूरकरांना व्यावसायिकदृष्ट्या मोठा फायदा होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचे दोन ते अडीच तास वाचणार आहेत. देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचं जाळं तयार केलं जात आहे. सुसाट वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर - पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता लातूरकरांसाठी एक गुड न्यूज आहे. लवकरच मुंबई - लातूर वंदे भारत एक्स्प्रेस धावताना दिसणार आहे.
मुंबई ते लातूर हा 525 किलोमीटरपर्यंत अंतर असून, रस्ते मार्गाने साधारण 11 ते 12 तासांचा वेळ लागतो. एक्स्प्रेसनेही जवळपास 9.30 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हेच अंतर 7 ते 7.30 तासांवर येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. अंदाजे माहितीनुसार ही एक्स्प्रेस सीएसएमटीवरुन सकाळी 6 वाजता निघेल आणि लातूरला दुपारी 1 ते 1.30 पर्यंत पोहोचेल. CSMT, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी, धाराशिव आणि लातूर....
लातूरच्या ऐतिहासिक ठिकाणांना उजाळा...
मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या लातूरमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक ठिकाणं आहेत. मात्र अनेकदा लातूर एक दुष्काळी जिल्हा म्हणून त्याकडे पाहिलं जातं. मुंबई ते लातूर वंदे भारत एक्स्प्रेसमुळे ऐतिहासिक ठिकाणांना उजाळा मिळू शकेल. लातूरमध्ये प्रसिद्ध सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, अष्टविनायक मंदिर, सूरत शहवली दर्गा ही धार्मिक स्थळं आहे. याशिवाय लातूरमध्ये देशातील सर्वात मोठं सोयाबीन केंद्र आहे. मुंबई-लातूर वंदे भारत एक्स्प्रेसमुळे व्यवसाय वाढीला लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.