परभणी.! न्यायालयीन कोठडीतील एकाचा मृत्यू...

परभणी.! न्यायालयीन कोठडीतील एकाचा मृत्यू...

प्रतिनिधी - शांतीलाल शर्मा, परभणी 

परभणी बुधवार ११ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान दगडफेकीची घटना घडली होती. सदर प्रकरणात नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात असलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीतील एका आरोपीचा रविवार १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास मृत्यू झाला. सदर आरोपीस जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असता त्याला मयत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी झाली.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी वय ३५ वर्ष, रा. शंकर नगर असे मयताचे नाव आहे. सदर युवकावर ११ डिसेंबरला नवामोंढा पोलीसात गुन्हा नोंद झाला होता. त्याला ताब्यात घेण्यात आले होते. सध्या हा युवक कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये होता. या युवकाला रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असता त्याला मयत घोषित करण्यात आले.

घटनेची माहिती समजताच  मोठ्या संख्येने भिम अनुयायी जिल्हा रुग्णालयात सामान्य दाखल झाले होते या वेळी  पोलीसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. सदर घटनेची माहिती पसरताच बाजारपेठ बंद झाली. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवाही बंद करण्यात आली.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात जमा झालेले लोकप्रतिनिधी, समाज बांधव यांच्याशी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद साधला.