*आळंदीत तरुणीवर अत्याचार ;* *कीर्तनकारसह पाच जणांवर गुन्हा दाखल..*

आळंदी : वारकरी शिक्षण संस्थेत एका तरुणीला डांबून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात एक महिला कीर्तनकारसह पाच जणांविरोधात बलात्कार, अपहरण, धमकी आणि गुन्हेगारी कट रचण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आळंदी शहरातील केळगाव रस्त्यावरील एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत घडली. पीडित तरुणी घरी एकटी असताना, तिच्या ओळखीच्या महिलेने "शेतात चल" असे म्हणत तिला बाहेर बोलावले. त्यानंतर वाटेत एक काळ्या रंगाची गाडी आली, ज्यामध्ये अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे आणि एक अनोळखी चालक होते. या तिघांनी तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि आरडाओरड केल्यावर ऍसिड टाकण्याची धमकी दिली.

त्यानंतर तिला आळंदीतल्या मुलींसाठी असलेल्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीत नेण्यात आले. या ठिकाणी अण्णासाहेब आंधळे याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच प्रवीण आंधळे, अभिमन्यू आंधळे आणि महिला कीर्तनकार सुनिता आंधळे यांनी पीडित तरुणीला खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर मानसिक दबाव टाकून लग्नासाठीही जबरदस्ती केली.

पीडित तरुणीने प्रसंगावधान राखत पोलीस हेल्पलाइनला फोन केला. त्यानंतर आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, यानंतरही थेट फिर्याद नोंदवण्यात आली नव्हती. अखेर ७ जुलै रोजी पीडित तरुणीने शेवगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

याप्रकरणी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, गाडीचा चालक, सुनीता अभिमन्यू आंधळे आणि अभिमन्यू भगवान आंधळे या पाच जणांविरोधात भादंवि कलम ३७६ (बलात्कार), ३६३ (अपहरण), ५०६ (धमकी) आणि १२०(ब) (गुन्हेगारी कट रचणे) या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपींपैकी सुनिता आंधळे या एक कीर्तनकार असून त्यांना कीर्तनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या प्रकाराने वारकरी संप्रदायातही खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम राबवली जात आहे.