शिंदवड येथे दि.१४ रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात...

शिंदवड येथे दि.१४ रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक 

दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र शिंदवड येथील संत जिवनेश्वर काळुबाबा यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यस्मरण सोहळ्या निमित्ताने; भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन भाविकांकडून करण्यात आले आहे. यावर्षी बाबांची ५० वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होत असून, या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची जय्यत तयारी मागील महिनाभरापासुन सुरु झालीय.

मंडप उभारणी, धर्मध्वजारोहण, विद्युत रोषणाई, धार्मिक कार्यक्रम, दररोज होणाऱ्या किर्तन सेवेनंतर सर्व भाविकांना महाप्रसाद या आदी कार्यक्रमांचे नियोजन मागील काही दिवसांपासुन जिवनेश्वर  तरुण मित्र परिवार, शिंदवड ग्रामस्थ व भजनी मंडळाकडुन करण्यात येत आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने पार्किंगची देखील सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. भाविकांची कुठलीही गैरसोय या ठिकाणी होणार नाही याची काळजी आश्रमाकडडून घेतली जात आहे.

अखंड हरिनाम सप्ताह काळात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पुढील प्रमाणे.!

बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०२४ ते बुधवार दि.२१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी ३:३० वा ह.भ.प. नामनिष्ठ स्वामी शिवलिंग स्वामी यांचे प्रवचन होईल. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ११.३० ते १२.३० गाथाभजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन आणि ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरीकीर्तन ९ ते ११ भजन संध्या इत्यादी कार्यक्रम होणार असून, सातही दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

ह.भ.प.प्रेममुर्ती अनिल महाराज पाटील (बार्शिकर), ह.भ.प. गुरुवर्य एकनाथ महाराज माने, ह.भ.प वारकरी भुषण उमेश महाराज दशरथे, ह.भ.प. श्रीगुरु  कानोबा महाराज मोरे, ह.भ.प अँड जयवंत महाराज बोधले, ह.भ.प. नामनिष्ठ ज्ञानेश्वर माऊली शिंदे, ह.भ.प. श्रीगुरु चैतन्य महाराज देगलुरकर, कीर्तनकेसरी संजय नाना धोंडगे, ह.भ.प. विदर्भरत्न संजयजी महाराज पाचपोर यांच्या किर्तनांचा समावेश आहे. दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प धर्मभुषण ज्ञानेश्वर महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या ज्ञानअमृताचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिवनेश्वर भक्त परिवार व ग्रामस्थ शिंदवड यांचेतर्फे करण्यात आले आहे.