चांदीची वीट घेऊन सायकलीने 7 युवक निघाले अयोध्येला...

चांदीची वीट घेऊन सायकलीने 7 युवक निघाले अयोध्येला...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजू कैलासवार

यवतमाळ : तेलंगाणा - हैद्राबाद भाग्य नगर डबीलपुरा येथून 7 रामभक्त युवक सायकलीने 1150 किलोमीटर वरील श्री रामचंद्र प्रभूजी नगरी अयोध्या येथे निघाले आहेत. सदर सर्व युवक व्यवसायाने कॉन्टॅक्टर ( ठेकेदार ) असून, अय्यप्पा स्वामीचे सुद्धा ते भक्त आहेत.

17 डिसेंबर 2023 ला आपल्या प्रवासाची सुरुवात केलेल्या या युवकांनी 1 ते 2 जानेवारी 2024 पर्यंत आयोध्या नगरी येथे पोहोचण्याचा मनोदय व्यक्त केला. आमच्या कणाकणामध्ये हिंदुत्व असून, आमचे आदर्श हे श्रीराम आहेत. त्यांच्या मंदिराचे बांधकाम सुरू असून, 22 जानेवारीला रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आयोजित करण्यात आली आहे. याकरिता आपणाकडून खारीचा वाटा म्हणून चांदीची वीट आपण सोबत घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्यासह 2 मोटरसायकलस्वार सुद्धा प्रवास करीत आहेत. दररोज जवळपास 80 किलोमीटरचे अंतर आपण कापत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 350 किलोमीटर अंतर पार करण्यात आले असून, जवळपास 800 किलोमीटरचे अंतर बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. अखंड भारत वासीयांचे कित्येक वर्षापासून जे स्वप्न साकारण्यात आले असून, राममंदिराची उभारनी झाल्याने ते स्वप्न पूर्ण झाले. नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांच्या सहयोगाने हे स्वप्नं पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या समर्थनार्थ 2 जानेवारी 2024 ला अयोध्याला सायकलने पोहचणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. हे सर्व अय्यपा दीक्षा सनिधान या ग्रुपचे सदस्य असून रामभक्त आहेत. अनिष श्रीनिवास, ए.देवराज, ए.नरेश, के. शिवा, जी. गणेश यादव, एम, महेश कुमार, एम. वमसी, पी.यादव, बलराम रेड्डी, डी आदर्श, सचिन हे सर्व भक्त पाटणबोरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.44 वरून जात असताना सदर प्रतिनिधीने त्यांच्यासोबत वार्तालाप केला. आज रात्रीचा मुक्काम केळापूर येथील जगदंबा मातेच्या मंदिरात करणार असायचे त्यांनी सांगितले. मार्गावरून जात असताना जेथे मंदिर मिळेल तिथेच मुक्काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.