अंगणवाडी सेविकांनी व मातांनी बालकांच्या शारीरिक विकासासाठी प्राधान्य द्यावे - श्री. कवाळे
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
आजच्या या धकाधकीच्या दुनियेत अंगणवाडी सेविकांनी व महिलांनी बालकांच्या शारीरिक सर्वांगीण विकासासाठी विशेष महत्व दिले पाहिजे असे प्रतिपादन; दिंडोरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी विलास कवाळे यांनी केले आहे.
पालखेड बंधारा येथे मंगळवार दि.१२ रोजी पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास कवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रेखा गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक बोराडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी गुंजाळ, दिंडोरी बीटाच्या अंगणवाडी पदाधिकारी गवळी आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस यांनी विविध पाककृती कडधान्य पालेभाज्या तृणधान्य फळे यांचे प्रदर्शन मांडले होते. या प्रदर्शनातही खाद्यपदार्थांचे शरीरासाठी असलेले महत्त्व अंगणवाडी सेविकांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर दिंडी काढून आरोग्य विषयी घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका संगीता मोंढे, सरला गोतरणे, लता गोतरणे, ललिता शेलार. श्रीमती गांगुर्डे ताई गोतरणे, नबाबाई गोतरणे, दादा गाढवे, साहेबराव गोतरणे आदींनी परिश्रम घेतले.