कामकाजावर बहिष्कार कायम.! तर आशा स्वयंसेविकांकडून आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा
![कामकाजावर बहिष्कार कायम.! तर आशा स्वयंसेविकांकडून आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65b0ca159d9de.jpg)
NEWS15 मराठी छत्रपती संभाजीनगर : जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत.! तोपर्यंत ऑनलाइन कामावर बहिष्कार आणि आंदोलन आणखी तीव्र छेडनार असल्याचा इशारा आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी युनियन संघटनेने मंगळवारी (ता. २३) दिला आहे. आशा स्वयंसेविका, गटप्रर्वतक यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय झालेला असताना; अद्याप त्याची अमलबाजवणी करण्यात आली नसल्याने, २९ जानेवारीपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मंगल ठोंबरे यांनी यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी पुन्हा एकदा आशा स्वयंसेविका महापालिकेत जमा झाल्या. आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी युनियनतर्फे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेच्या यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी हा विषय शासनस्तरावरचा असून, तुमच्या भावना शासनाला कळविल्या जातील, असे आश्वासन दिले.
त्यानंतर महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात द्वारसभा घेण्यात आली. या द्वारसभेत पदाधिकाऱ्यांनी शासनावर टीका केली. शासन महिलांचे प्रश्न सोडविण्याचे केवळ नाटक करत आहे. त्यामुळे सरकारवर आता विश्वास ठेवायचा नाही. मोबदला वाढीच्या निर्णयाची घोषणा दोन महिन्यांपूर्वी झाली आहे. पण, अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. हे सरकार केवळ घोषणाबाजी करण्यातच माहीर आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.
या द्वारसभा प्रसंगी सुजाता धनेधर, सुनीता जैस्वाल, अनिता दाभाडे, मंगल मोरे, मनोरमा रमंडवाल, हर्षा पवार, मीरा जाटवे, ज्योती अवसरमल, जयश्री जाधव, अनुपमा जाधव, नीलिमा जगताप, सुनीता म्हस्के, माधुरी मुनवर, मनीषा साळवे सुनीता काळे, नीता बोटके, लंका अवसरमल, अनिता ताठे, गंगोत्री सोनवणे, जयश्री चोरमारे, सुनीता बत्तिसे, कल्पना पवार, अश्विनी उबाळे, ज्योती सागरे, दीक्षा आढाव, मनीषा जोगदंडे, पल्लवी कुटे, रंजना तुरनकमाने, सुनीता कामजळगे, माधवी पवार उपस्थित होते.