सहा शेतकर्यांकडून अफूची सामूहिक शेती.! पोलीसांकडून चौघांना अटक, तर कोटीचा मुद्देमाल जप्त...
![सहा शेतकर्यांकडून अफूची सामूहिक शेती.! पोलीसांकडून चौघांना अटक, तर कोटीचा मुद्देमाल जप्त...](https://news15marathi.com/uploads/images/202303/image_750x_640325a680b9e.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - पुणे (इंदापूर)
पुणे जिल्ह्यातील (इंदापूर) पळसदेव जवळील माळेवाडीच्या हद्दीत; सहा शेतकर्यांनी सामूहिक अफुची शेती केल्याचे उघडकीस आले आहे. यासंबंधी शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करुन, सध्या चार जणांना अटक करण्यात आली असून, सुमारे १ कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; आरोपींनी त्यांच्या माळेवाडी गावच्या हद्दीतील जमिनीवर थोडया-थोड्या अंतरावर बेकायदेशीररित्या विनापरवाना व्यवसायिक हेतूने, एकूण ७ हजार ८७ किलो वजनाची अफूची झाडे लावली होती. ३ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी तपास केला असता हे प्रकरण समोर आलं. सहा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आलीय. काशीनाथ रामभाऊ बनसुडे, दत्तात्रय मारुती बनसुडे, राजाराम दगडु शेलार, लक्ष्मण सदाशिव बनसुडे, माधव मोतीराम बनसुडे, रामदास जगन्नाथ शिंदे (सर्व रा. माळेवाडी, पळसदेव, ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १ कोटी ४१ लाख ७४ हजार रुपयांची ७ हजार ८७ किलो वजनाची झाडे जप्त केली आहेत. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, एन.डी.पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८,१५, १८, ४६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने अधिक तपास करत आहेत.