क्राईम : तीर्थक्षेत्र आळंदी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघड...!
![क्राईम : तीर्थक्षेत्र आळंदी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघड...!](https://news15marathi.com/uploads/images/202501/image_750x_677a956e457cd.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
आळंदी देवाची : तीर्थक्षेत्र आळंदीमधील एका गुरुकुलमध्ये दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे याच संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. ही घटना शनिवारी (दि. ४) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पीडित बारा वर्षीय मुलाच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून, महेश नामदेव मिसाळ मामा (वय.२८ वर्षे,रा. खोकरमोहा,ता.शिरूरकासार,जि. बीड) आणि त्याची बहीण ऋतुजा भीमराव दराडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला ज्ञानेश्वरी गुरुकुल नामक संस्था आहे. त्या संस्थेत आरोपी हा पाहुणा म्हणून आलेला होता. शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला. दरम्यान त्याने दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी महेश मिसाळ या आरोपीला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अटक केली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.