इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सवांच्या प्रश्नांसाठी; शासकीय समिती गठित
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
राज्यातील 30 हजार इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांना आपला व्यवसाय करता यावा यासाठी; राज्य सरकारने 30 ऑक्टोबर रोजी तज्ज्ञांची शासकीय समिती गठित केली असल्याची माहिती मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेचे राज्य कमिटी सदस्य डॉ. एम. एम. पानगव्हाणे यांनी दिली आहे.
इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सापध्दती ही संपुर्ण वनस्पतीवर आधारित औषध पध्दती आहे. शीघ्र प्रभावी तसेच स्वस्त आणि दुष्पपरिणामरहित अशी नैसर्गिक चिकित्सा याव्दारे होत असते. या चिकित्सा पध्दतीमध्ये महाराष्ट्रात गेल्या 25 वर्षांपासून सुमारे तीस हजार चिकित्सक आपला वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. अनेक वर्षांपासून या पध्दतीस शासन मान्यता मिळावी अशी मागणी देशभरातील लाखो चिकित्सकांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली जात होती. यास प्रतिसाद देत 28 फेबु्रवारी 2017 रोजी केंद्र शासनाने 22 उच्चस्तरीय अधिकार्यांची इंटर डिपार्टमॅटल कमिटी आय.डी.सी. कमिटी स्थापन करुन आय.सी.एम. आरसह ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडीयासारख्या डिपार्टमेंटचा या कमिटीमध्ये समावेश केलेला आहे. या समितीकडून गेल्या सहा वर्षांपासून इलेक्ट्रोहोमिओपॅथी हे एक स्वतंत्र वैद्यकीय शास्त्र होऊ शकतो का? याची पडताळणी सुरु आहे. कमिटी शेवटच्या निष्कर्षापर्यंत पोहोचली असून, ते काही दिवसांतच आपला अंतिम अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे.