प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.! सर्वसामान्यांची जीवनवाहिनी लालपरी पूर्ववत होणार...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.! सर्वसामान्यांची जीवनवाहिनी लालपरी पूर्ववत होणार...

NEWS15 मराठी रिपोर्ट - पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बससेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयानुसार लवकरच राज्यातील एसटी बससेवा पूर्वरत होईल असं महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. महामंडळाने गुरूवारी रात्रीपासूनच इतर विभागाच्या अकडून पडलेल्या गाड्या सोडण्यास सुरूवात केलीय.

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं आणि मराठा आरक्षण या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या या उपोषणाला राज्यभरातील अनेक मराठा बांधवांनी पाठिंबा दिला. जरांगे यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलने सुद्धा झाली. या आंदोलनाचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला असून, ठिकठिकाणी आंदोलकांनी बसेसची जाळपोळ तसेच तोडफोड केली होती. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लुटमार सुरू होती. आता राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. त्यामुळं राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बससेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयानुसार लवकरच राज्यातील एसटी बससेवा पूर्वरत होईल असं महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. महामंडळाने गुरूवारी रात्रीपासूनच इतर विभागाच्या अकडून पडलेल्या गाड्या सोडण्यास सुरूवात केलीय.

आंदोलनामुळे पुणे आगाराने मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या होत्या. गेले दोन दिवस पुण्यातून जाणाऱ्या ७८० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. अखेर गुरूवारी रात्री मराठा आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर एसटी महामंडळाने पुण्यातून त्यांची सर्व बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातून संपूर्ण दिवसाला साधारण १३०० ते १४०० एसटी बसच्या फेऱ्या सुरू असतात. त्या सर्व पूर्ववत केल्या जाणार आहेत. तसेच, रात्री दहानंतर इतर आगाराच्या पुण्यात अडकून पडलेल्या बस रवाना केल्या जाणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा आहे.