मौदी पुनर्वसन येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न.! मौदी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

मौदी पुनर्वसन येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न.! मौदी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

भंडारा | प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार

मौदी पुनर्वसन (ता. व जि. भंडारा) ग्रामपंचायतीच्या वतीने २२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू कार्यक्रम अत्यंत उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री विनोद वंजारी (माजी सरपंच) विराजमान होत्या.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट व शिस्तबद्ध संचालन ग्रामसेवक बोरकर साहेब यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीचे इतर कर्मचारी तसेच गावातील महिला मंडळातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, गीत गायन स्पर्धा यांसह विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी महिलांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मौदी ग्रामपंचायतीच्या भव्य पटांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती लाभली. हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये आनंद, उत्साह आणि सामाजिक एकोपा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी महिला मंडळ व ग्रामपंचायतीचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे महिलांना आपले विचार व कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.