‘दिव्याखाली अंधार’ || विदर्भातील मोठी यात्रा सुरू - पण अड्याळमध्ये पथदिवे बंदच - ग्रामस्थांचा जनआंदोलनाचा इशारा...
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा
'दिव्याखाली अंधार' या उक्तीचा प्रत्यय सध्या पवनी तालुक्यातील अड्याळमध्ये येत आहे. विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी अड्याळची यात्रा रामनवमीपासून मोठ्या उत्साहात सुरू झाली असताना, गावातील रस्त्यांवरील पथदिवे मात्र बंद आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून रस्ते आणि पथदिवे लावले, पण ते सध्या केवळ 'शोभेच्या वस्तू' ठरत असल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अड्याळ येथे रामनवमी ते हनुमान जयंती या काळात भव्य यात्रा भरते. या यात्रेसाठी दूरदूरवरून लाखो भाविक हनुमंताच्या दर्शनासाठी, भागवत श्रवणासाठी आणि बाजार ग्राउंडमधील मनोरंजनासाठी येत असतात. रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठी गर्दी असते. मात्र, कारधि ते निलज या नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने भाविकांना अंधारात चाचपडावे लागत आहे.
अड्याळ हे तालुक्यातील एक प्रमुख गाव असूनही या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. यात्रेसारख्या मोठ्या सोहळ्याच्या वेळीही पथदिवे सुरू न होणे, ही लोकप्रतिनिधींची उदासीनता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या ज्वलंत प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते राहुल शिवरकर, आशिक नैतामे, कमलेश जाधव, बालू धाबेकर आणि ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या काही दिवसांत जर प्रशासनाने ही समस्या सोडवून पथदिवे सुरू केले नाहीत, तर होणाऱ्या जनआंदोलनाला प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यात्रेच्या काळात व इतर वेळेस पण रस्त्यावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने झोपेतून जागे होऊन तातडीने प्रकाश व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
