मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या; मुजोर अखिलेश शुक्लाचे निलंबन...

कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स सोसायटीत एमटीडीसी विभाग व्यवस्थापक अखिलेश शुक्लाने किरकोळ वादातून मराठी कुटुंबावर हल्ला करण्यासाठी गुंडांना बोलावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हिंसक संघर्षात तीन जण जखमी झाले. एकावर सध्या मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच वादात मराठी माणसांवरून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले.
यानंतर वातावरण तापलं होतं. या वादात मनसेनेही उडी घेत आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. तर विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला आहे. यानंतर आता मुजोर अखिलेश शुक्लाचे निलंबन करण्यात आले आहे.
मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (MTDC) मुजोर अधिकारी अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कल्याणमधील योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या इमारतीमध्ये राहणाऱ्या अखिलेश शुक्ला यांनी त्यांचे शेजारी असणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात महत्त्वाची घोषणा केली. त्यानुसार माजोरड्या अखिलेश शुक्ला यांना तात्काळा प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. तर त्याला आता अटकही करण्यात आली आहे.