इतिहासाची साक्ष देणारा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...

प्रतिनिधी - शांतीलाल शर्मा, परभणी
पालम येथे ग्रामदैवत खंडोबाचा आगळा-वेगळा पालखी सोहळा दि. 16 डिसेंबर रोजी सायंकाळी मोठ्या भक्तीभावाने साजरा. इतिहासाची साक्ष देणारा हा आगळावेगळा सोहळा संपन्न झाला. यावेळी भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालम येथे खंडोबाचे हेमाडपंती मंदिर आहे. मंदिरातील सभागृहात असलेला कोरीव शिलालेख पौराणिक शिल्पलेखाचा आदर्श नमुना आहे. या देवतेच्या उत्सवासाठी पांडे, पत्की, गुरव, मालीपाटील, पाटील हे पाच मानकरी नेमले आहेत.
मार्गशिर्ष शु.७ पासून मार्गशिर्ष शु. पौर्णिमेपर्यंत खंडोबाचा उत्सव असतो. या काळात मानकरी शाहूराव पत्की यांच्या देवघरातील अश्वारुढ खंडोबाची मूर्ती मंदिरापर्यंत नेण्यात येते. मंदिरात आरती करुन ती परत घरी नेण्यात येते.अस हा नित्यक्रम पौर्णिमेपर्यंत चालतो, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सागवानी लाकडाच्या २० फुटी पालखीत देवाची मूर्ती ठेवून सर्व मानकरी व गावकऱ्यांसह वाजत गाजत मंदिरापर्यंत नेली जाते. तिथे मंदिरासभोवती पाच प्रदक्षिणा घालून ही पालखी पालमपासून ५ किमी.अंतरावर असलेल्या गोदावरीच्या पात्रात देवतांना स्नान घालून परत पालमकडे आणण्यात येते. पालखीचे वजन एक ते दीड क्विंटल असते, एवढ्या वजनाची पालखी भाविक कुठेही न टेकवत गोदावरी पात्र असलेल्या सोमेश्वर येथे घेऊन जातात.
पालखी पालम शहरात आल्यावर दोन गट तयार होऊन पालखी आपापल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करतात, अन्य गावांतील भाविकही भक्तीभावाने या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरात दाखल होतात. हा पालखी सोहळा मारोती मंदिरापासून सुरू होता त्यानंतर रोकडे गल्ली,राम मंदिर,मोतीराम महाराज मंदिरापर्यंत खेळत नेला जातो. या खेळात विविध समाजातील भक्त सहभागी असतात. या दरम्यान खोबरे व हळद उधळली जाते. पालमची पौराणिक ओळख बनलेला हा सोहळा आगही तेवढ्याच भक्तीभावाने संपन्न झाला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले