बीड'जिल्ह्यात आता पोलिसांना आडनाव नसणार.! पोलीस आधीक्षकांचा मोठा निर्णय...

बीड'जिल्ह्यात आता पोलिसांना आडनाव नसणार.! पोलीस आधीक्षकांचा मोठा निर्णय...

बीड जिल्हा म्हंटलं की.! नजरेसमोर येते ती मागील काही दिवसांपासून वाढलेली गुन्हेगारी.! तर या गुन्हेगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठ आव्हान निर्माण झाल असून, गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि पोलिस दलाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यासाठी तसेच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कायम राहावा'यासाठी बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पोलीस अधीक्षक यांच्या निर्णयानुसार; यापुढे आता बीडमधील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेटवरून आडनाव हटवले जाणार आहे. राज्यात पोलीस खात्याने प्रथमच असा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार, पोलीस अधीक्षकांपासून ते कॉन्स्टेबलपर्यंत सर्व अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या छातीवरील व टेबलावरील नेमप्लेटवर केवळ नाव असणार आहे. यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याची ओळख त्याच्या आडनावावरून न होता, फक्त नावाने होणार आहे. प्रशासनाच्या मते, यामुळे पोलीस दल अधिक तटस्थ आणि समान दृष्टिकोन ठेवून काम करू शकेल.

पोलीस दलात जात, धर्म किंवा पार्श्वभूमीवर आधारित कोणताही भेदभाव नसावा, या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला आहे. अनेकदा लोक आडनावावरून पोलीस अधिकाऱ्यांबद्दल वेगवेगळी मते तयार करतात, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ शकतो. नेमप्लेटवर फक्त नाव ठेवण्याचा निर्णय हा सामाजिक सलोखा आणि एकसंधता कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचा पाऊल मानला जात आहे. या निर्णयामुळे पोलिसांचे काम अधिक पारदर्शक होईल आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना पोलिस अधिकाऱ्यांचा दर्जा, त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी यापेक्षा त्यांचे काम महत्त्वाचे वाटले पाहिजे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात हा निर्णय लागू झाल्यानंतर इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारची व्यवस्था लागू करता येईल का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात हा निर्णय आदर्शवत ठरू शकतो. अनेक सामाजिक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, जात आणि भेदभावमुक्त प्रशासनाचा आदर्श तयार होईल, असे मत व्यक्त केले आहे.