राजकीय : खेड तालुक्यातील राजकारण शक्यतेच्या गर्तेत, हा इकडे तो तिकडे..!

राजकीय : खेड तालुक्यातील राजकारण शक्यतेच्या गर्तेत, हा इकडे तो तिकडे..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

खेड(राजगुरूनगर) : सध्या महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच ठिकाणचे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. तरी अजूनही पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभेतील महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होताना दिसत नाही. कालच खेड-आळंदी विधानसभेची जागा उबाठा गटाला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर सगळ्या खेड तालुक्यातुण उबाठा गटाकडून कोणत्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी जाहीर होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 

पण आता पुन्हा खेड तालुक्याच्या राजकारणात नवीनच ट्विस्ट आल्याचे दिसत आहे. खेड-आळंदी विधानसभेची जागा शरद पवार यांच्या पक्षाला सुटेल या आशेने काही महिन्यापूर्वी भाजपा मधून शरद पवार पक्षात आलेले अतुल देशमुख यांनी तिकीटासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. पण ऐनवेळी जागा उबाठा गटाला सुटल्याने तालुक्यातील अतुल देशमुख समर्थकांचा मेळावा घेऊन राजकारणात काहीही होऊ शकते या शक्यतेवर तालुक्यातील उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. 

आता शक्यतेच्या राजकारणामुळे महायुतीकडून अगोदरच उमेदवारी जाहीर झालेले विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्या उलट आता उबाठा गटाकडून प्रबळ दावेदार असलेले बाबाजी काळे, अमोल पवार, अशोक खांडेभराड यांच्यात उमेदवारीसाठी एकमत होत नसल्याने आता काही वेळापूर्वी अशीही माहिती समोर आली आहे की, शरद पवार पक्षाकडून इच्छुक असणारे सुधीर मुंगसे यांनी आपल्या सासऱ्यांचे राजकीय वजन वापरुन उबाठा गटात प्रवेश करून तिकीट मिळविण्याची तयारी सुरु करत असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यात किती सत्यता आहे हे सांगता येणार नाही. पण खेडच्या राजकारणात नवनवीन ट्विटस आल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

दुसरीकडे शरद पवार गटाकडून अतुल देशमुख यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा तालुक्यात होत असतानाच त्यांना ऐनवेळी पक्षाने कात्रजचा घाट दाखविण्यात आल्याने त्यांनी रविवारी मोठे शक्तीप्रदर्शन करून पुन्हा मुंबईकडे प्रयाण करून ते शेवट पर्यंत शरद पवार यांना साकडे घालून बसले आहेत. शेवटच्या क्षणी जर तिकीट भेटले नाही तर अतुल देशमुख मनसेचा झेंडा हाती घेऊन उमेदवारी करू शकतात अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच सगळ्या शक्यतेच्या गर्तेत तालुका असताना युवा चेहरा म्हणून अक्षय जाधव यांनी ३० हजार जनसमुदायाला घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन करून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मैदान मारण्याची तयारी सुरु केली आहे.

त्यामुळे खेड -आळंदी विधानसभेच्या निवडणूकीत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. पण सध्याची खेड तालुक्यातील राजकीय स्थिती हा इकडे, तो तिकडे अशीच काहीशी झाली आहे.