पाटणबोरी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये मसन जोगी समाजासाठी रस्त्याचा मार्ग मोकळा; अनिल पुलोजवार यांच्या पुढाकाराने वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी...

पाटणबोरी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये मसन जोगी समाजासाठी रस्त्याचा मार्ग मोकळा; अनिल पुलोजवार यांच्या पुढाकाराने वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी...

पाटणबोरी | प्रतिनिधी : गजू कैलासवार (यवतमाळ)

पाटणबोरी येथील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये राहणाऱ्या मसन जोगी समाज बांधवांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या भागात पायवाट वगळता वाहनांसाठी कोणताही रस्ता नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

जुना पायवाट रस्ता झाडे, झुडपे, कचऱ्याचे ढिगारे आणि घाणीमुळे पूर्णतः बंद अवस्थेत होता. या रस्त्याकडे आजपर्यंत कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नव्हते. मात्र माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल भाऊ पुलोजवार यांच्या पुढाकाराने या प्रश्नाला वाचा फुटली.

अनिल पुलोजवार यांनी स्वतः पुढाकार घेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील झाडे, झुडपे, कचरा हटवून साफसफाई केली. त्यानंतर मुरूम टाकून पायवाटेचा रस्ता वाहनांसाठी योग्य बनवण्यात आला. त्यामुळे आता मसन जोगी समाजातील नागरिकांना चालत तसेच दुचाकी व इतर वाहनांनी सहज ये-जा करता येणार आहे.

या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अनिल पुलोजवार हे खरोखरच गावाच्या हिताचे काम करणारे विकासाभिमुख नेतृत्व आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा विकासकाम करणाऱ्या लोकांनाच संधी द्यावी, अशी चर्चा गावात जोर धरू लागली आहे.