सोलापूर मध्ये शेततळे योजना पुन्हा सुरू, शेतकऱ्यांनो करा याठिकाणी अर्ज अनुदान ७५ हजार...!

सोलापूर मध्ये शेततळे योजना पुन्हा सुरू, शेतकऱ्यांनो करा याठिकाणी अर्ज अनुदान ७५ हजार...!

News15 मराठी प्रतिनिधी प्रवीण मखरे

सोलापूर : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेचा विस्तार करुन या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रक्कम ७५ हजारच्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. तरी वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर (www.mahadbtmahait.gov.in) नजीकच्यासामुदायिक सेवा केंद्रात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे कि, सोलापूर हा मुख्यत्वे पर्जन्यधारित जिल्हा असून जिल्ह्यातील शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. पावसाचे होणारे असमान आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड या प्रमुख नैसर्गिक अडचणीत आहेत. अशा कालावधीत सिंचन सुविधे अभावी पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते अथवा पावसाचा खूप जास्त ताण पडल्यास पिकेदेखील नष्ट होतात व पर्यायाने शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीस समोरे जावे लागते.

यावर उपाय म्हणजे उपलब्ध सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करुन त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सिंचन सुविधा उभी करण्यास चालना देणे हा आहे. याकरिता सन २०२२-२३ पासून मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेचा विस्तार करून योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन या योजनेंतर्गत शेततळे या घटकाची महा डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन सोडतीद्वारे लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. लाभार्थीकडून शेततळे पूर्ण झाल्यानंतर योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेले अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर पीएफएमएस (PFMS) प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत शेततळे यंत्राद्वारे खोदता येणार आहे. तसेच या योजनेची ज्या ठिकाणी शक्य होईल तेथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेशी सांगड घालण्यात येणार आहे.