तळेगाव येथे भरदिवसा बिबट्याचे दर्शन, पिंजरा लावण्याची मागणी...

तळेगाव येथे भरदिवसा बिबट्याचे दर्शन, पिंजरा लावण्याची मागणी...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : गेल्या काही वर्षांपासून दिंडोरी तालुक्यातील पूर्व व पश्चिम भागामध्ये बिबट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने या बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे,गाई,वासरे,शेळ्या मेंढ्या, बकरे,यांना बळीचा बकरा बनवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.वन विभागातर्फे अनेक ठिकाणी पिंजरे देखील लावण्यात आले परंतु आत्तापर्यंत हे बिबटे या पिंजऱ्यांमध्ये येत नसल्याने वनविभागाचे कर्मचारी व शेतकरी हैराण झाले आहे. 

तालुक्यातील तळेगाव दिं येथे भरदिवसा बिबट्याचे अचानक शेतकर्‍यांना दर्शन झाल्याने  शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील तलावाखालील बिबट्याला बघितल्यानंतर नागरिकांनी आरडा ओरडा करताच बिबट्याने मक्याच्या शेतामधून धुम ठोकली.तालुक्यातील पूर्व पश्चिम भागामध्ये या बिबट्यांचे सत्र सुरूच असल्याने यावर त्वरित उपाययोजना करून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.