सामाजिक : खराबवाडी गावातील आरुवस्तीवरील सांडपाण्याचा प्रश्न सुटेना,स्थानिक ग्रामस्थाच्या आडमुठे पणामुळे प्रशासन हतबल..!

सामाजिक : खराबवाडी गावातील आरुवस्तीवरील सांडपाण्याचा प्रश्न सुटेना,स्थानिक ग्रामस्थाच्या आडमुठे पणामुळे प्रशासन हतबल..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : मागील काही दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या खराबवाडी गावातील आरुवस्ती वरील रस्त्याचा प्रश्न काही स्थानिक ग्रामस्थांच्या आठमुठेपणामुळे सोडविण्यास अडचण निर्माण झाली आहे.  काही स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावरील सांडपाण्याचा प्रश्न पूर्णतः सोडविण्याची मागणी केली आहे तर काहींनी आमच्या हद्दीतून सांडपाणी काढून द्यायचे असेल तर त्याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी लाऊन धरली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या आडमुठे पणामुळे खराबवाडी ग्रामपंचायत प्रशासनाला हतबल होऊन अर्धवट काम बंद करण्याची वेळ आली आहे.

आरुवस्ती वरील ग्रामस्थांनी १०/११ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत प्रशासन,पंचायत समिती प्रशासन तसेच तहसिलदार खेड यांना निवेदन देऊन रस्त्याच्या सांडपाण्याच्या संदर्भात आठ दिवसात रस्त्याचा सांडपाण्याचा प्रश्न सोडवा नाहीतर आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यावर खराबवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने निवेदनाची तातडीने दाखल घेऊन रविवारी सुट्टी असतानाही आरुवस्ती वरील रस्त्याचा सांडपाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्परता दाखवली. प्रथमता आरुवस्तीवरील काही स्थानिक ग्रामस्थांनी गटाराचे काम करण्यास विरोध दर्शवला त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बळाची मदत घेऊन कामास सुरुवात केली. यावर ज्या ग्रामस्थांनी रस्त्यावरील सांडपाणी प्रश्न सुटावा यासाठी निवेदन दिले त्यांनी काम करायचे तर ते पूर्ण करा अशी मागणी केली.तर, काही ग्रामस्थांनी आमच्या हद्द्दीतून जर सांडपाणी गटार न्यायची असेल तर त्याचा आम्हाला मोबदला हवा असे कारण पुढे करून ग्रामपंचायत प्रशासन जे काम करत होते ते बंद पाडले.

या रस्त्याच्या संदर्भात मागेही एका प्लॉटिंग करणाऱ्या विकासकाने नैसर्गिक प्रवाह अडवून प्लॉटिंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी रस्त्यावर साचले होते. त्या प्लॉटिंगवाल्याने चुकीचे कामे करूनही मी यांना दाखवतो, मी त्यांना दाखवतो अशा अविर्भावात प्रशासनाला व नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले होते. मी मागील बऱ्याच दिवसापासून या परिसरात प्लॉटिंग करतो मला कोण अडवते बघतोच असा अविर्भाव दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काही स्थानिक ग्रामस्थांनीही नैसर्गिक प्रवाह अडवून त्या ठिकाणी बांधकाम केल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही नैसर्गिक प्रवाह अडवूनही सांडपाणी गटार तुमच्या जागेतून नेताना जागेचा मोबदला मागून सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करत असतील तर,अशा आडमुठ्या ग्रामस्थांवर व बेकायदेशीर प्लॉटिंग करणाऱ्यावर ग्रामपंचायत प्रशासन कडक कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करणार असल्याची खात्रीलायायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे बेकायदेशीर प्लॉटिंग करणारा तो विकासक आणि सांडपाणी गटार काढण्यास विरोध करणारे स्थानिक काही ग्रामस्थ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रोजच्या नरक यातना भोगणारे ग्रामस्थहि करताना दिसत आहेत.

यावर ग्रामपंचायत प्रशासनाच्या बरोबर जर काही विकासकांनी बेकायदेशीर प्लॉटिंग केले असेळ आणि काही स्थानिक ग्रामस्थांनी आडमुठे धोरण राबवून नैसर्गिक प्रवाह अडवला असेल तर अशा व्यक्तीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) या संस्थेकडूनहि थेट कारवाई करण्यात यावी असाही स्थानिक नागरिकांच्या मधून सूर उमटू लागला आहे. यावर आता PMRDA प्रशासन काय कारवाई करतात हेच पहावे लागेल.  

प्रतिक्रिया : १

आम्हाला स्थानिक नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापनाची मागणी केली होती. त्यावर आम्ही तातडीने कार्यवाही करण्यासाठी रविवारची सुट्टी असूनही आम्ही सांडपाणी गटारातील साचलेले पाणी काढून देण्याचे काम सुरु केले होते. यावर काहींनी काम पूर्णच करा असा आग्रह धरून काम बंद केले तर,काहींनी आमच्या हद्दीतून गटार पाणी काढू नका असा आग्रह धरून काम बंद केले. यावर आम्ही ग्रामपंचायत प्रशासन म्हणून गंभीर दखल घेऊन अडवणूक करणारे ग्रामस्थ आणि काही बेकायदेशीर प्लॉटिंग करून नैसर्गिक प्रवाह अडवून सांडपाणी रस्त्यावर सोडणारे जबाबदार व्यक्तीवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करणार आहोत.   

-खराबवाडी ग्रामपंचायत प्रशासन..

प्रतिक्रिया :२

आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला फक्त काम करायचे तर पूर्ण करा असा आग्रही मागणी केली आहे. जे लोक अडवणूक करतात त्यांच्या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने कडक कारवाई करून आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे करतो. आम्हाला जो त्रास होतो त्यातून आम्ही निवेदन दिलेल्या सर्व प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा.

-हनुमंत आरु,ग्रामस्थ..