अड्याळमध्ये गुन्हे दाखल असलेला तंटामुक्ती अध्यक्ष.! शासन नियमांची पायमल्ली?
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावात मोठा खळबळजनक वादंग घडला असून, तंटामुक्ती अध्यक्ष मुनिश्वर बोधलकर यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असूनही; ग्रामसभेत त्यांची निवड कशी झाली? हा प्रश्न आता गावकऱ्यांच्या तोंडी येऊ लागला आहे.
शासनाचा स्पष्ट नियमानुसार तंटामुक्ती अध्यक्ष निवडताना चारित्र्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे.! मात्र असे असतानाही ग्रामसभा अध्यक्ष आणि सचिव यांनी हा नियम पायदळी तुडवत त्यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासन निर्णय क्रमांक 1008/सीआर 43/2008 पोल 15 चं उल्लंघन करून गुन्हे नोंद असलेल्या व्यक्तीला अध्यक्षपदी बसवलं कसं? असं तक्रारकर्त्यांनी म्हंटल असून, त्यांनी जिल्हाधिकारी भंडारा, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी पवनी यांच्याकडे पुन्हा तक्रार दाखल केली आहे. वारंवार तक्रार करूनही कारवाई न झाल्याने; गावात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.
"गुन्हेगाराला अध्यक्षपद कसं?” हा सवाल गावकऱ्यांच्या मनाला भेडसावत आहे. तर अड्याळमध्ये आता संघर्षाचे ढग दाटले आहेत… तंटामुक्ती अध्यक्ष पद रद्द करावा ह्यासाठी प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.