चिराई घाटात सहा लाखांच्या किराणासह टेम्पो जळून खाक...

चिराई घाटात सहा लाखांच्या किराणासह टेम्पो जळून खाक...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात रविवारी बोरगावकडून सुरगाणाकडे जाणाऱ्या टेम्पोला अचानक लागलेल्या आगीत; १८ लाखांच्या टेम्पोसह आतील साडेसहा लाखांचा किराणा जळून खाक झाला आहे.

रविवारी दि.१२ रोजी सकाळी साडेआठ वाजता बोरगावकडून सुरगाणाकडे होलसेल किराणा घेऊन जाताना चिराई घाटात टेम्पो (एमएच ४९ एयू ४४६५) मध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली.चालक नंदलाल चौधरी यांच्यासह गौतम चौधरी, रवींद्र चौधरी (सर्व रा.दळवट ता.कळवण) लगेचच खाली उतरल्याने अघटित घडले नाही. त्यांनी तत्काळ सुरगाणा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाची गाडी वीस मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. मात्र, तोपर्यंत टेम्पोसह आतील साडेसहा लाखांचा किराणा जळून गेला होता.

अग्निशमन दलाचे चालक मनोज पवार, ऑपरेटर सोमनाथ बागुल, फायरमन विजय गोयल यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. या घटनेत साडेसहा लाखांच्या किराणासह १८ लाखांचा टेम्पो जळाला. घटनेची माहिती समजताच सुरगाणा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील आहेर, शिवराम गायकवाड किरण पवार उपस्थित झाले. याबाबत सुरगाणा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली. या घटनेमुळे बोरगाव सुरगाणा रोडवरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.